संदीप कदम, लोकसत्ता

मुंबई : गेली दोन वर्षे करोनाच्या निर्बंधांमुळे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन होत नव्हते. परंतु आता करोनाची साथ ओसरल्यामुळे उन्हाळी सुट्टीतल्या क्रीडा प्रशिक्षण शिबिरांना मुला-मुलींकडून उत्साही प्रतिसाद मिळत आहे.

दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिराचे शिबीर गेली ४८ वर्षे आयोजित केले जाते. यंदा १८ ते २७ एप्रिल या कालावधीत हे उन्हाळी शिबीर होणार आहे. याबाबत समर्थच्या व्यवस्थापन कार्यवाह डॉ. नीता ताटके म्हणाल्या की, ‘‘आमच्या शिबिराचे आयोजन नेहमीच शिस्तबद्ध पद्धतीने होत असते. शिबिरासाठीची नोंदणी सुरू झाली असून मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. लहान वयातच मुलांची शारीरिक क्षमता वाढवण्यासोबतच अन्य खेळांसाठी लागणारी शरीरयष्टी मिळवण्यावर अधिक भर दिला जातो. ’’

उन्हाळी सुटीत मुलांचा सर्वाधिक ओढा क्रिकेटकडे असतो. एकीकडे ‘आयपीएल’चे सामने मुंबईत चालू असताना तेच फटके खेळण्याचे शास्त्रोक्त ज्ञान घेण्याच्या उद्देशाने मुले क्रिकेट प्रशिक्षणासाठी नावे नोंदवतात. यासंदर्भात स्वामी विवेकानंद शाळेचे क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड म्हणाले की, ‘‘दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा क्रिकेटला शिबिरांना सुरुवात होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. याचा सर्वाधिक फायदा हा युवा क्रिकेटपटूंना होणार आहे. मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) शिबिरांनादेखील आता सुरुवात होणार आहे.’’

याबाबत माजी कबड्डीपटू, अभ्यासक शशिकांत राऊत म्हणाले, ‘‘करोना काळात खेळाडूंनी शारीरिक तंदुरुस्तीवर भर दिला. कबड्डीच्या उन्हाळी शिबिरांना नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत असतो. प्रो कबड्डीमुळे वेगळे वलय खेळाला मिळाले आहे. अनेकजण पैसे खर्च करून चांगल्या अकादमीमध्ये प्रवेश घेतात.’’

शिबिरांचे फायदे

’ आवडत्या खेळात तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभते.

’ मुलांना शारीरिक क्षमता वाढवण्यास मदत मिळते.

’ खेळामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.

’ मुलांचा सर्वागीण विकास साधला जातो.