अन्वय सावंत / संदीप कदम
मुंबई : प्रतिष्ठेच्या मुंबई मॅरेथॉनमध्ये इथिओपियाच्या धावपटूंना आपले वर्चस्व राखण्यात यश आले. सलग दुसऱ्या वर्षी इथिओपियाच्या धावपटूंनी ‘एलिट’ पुरुष आणि महिला या दोनही गटांमध्ये बाजी मारली. विशेष म्हणजे, पुरुषांमध्ये हायले लेमीला आपले जेतेपद राखण्यात यश आले. पुरुष गटात अव्वल दहा धावपटूंपैकी पाच हे इथिओपिया, तीन केनिया आणि दोन भारताचे होते. महिलांमध्ये मात्र इथिओपियाने पूर्णपणे वर्चस्व राखले. अव्वल आठही धावपटू इथिओपियाच्या होत्या. यात अबेराश मिन्सेवोने जेतेपद पटकावले.
रविवारी झालेल्या मुंबई मॅरेथॉनच्या १९व्या पर्वात विविध गटांमध्ये मिळून ५६ हजार धावपटूंनी सहभाग नोंदवला. यात सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा हायले लेमीने जिंकली. लेमीने ४२.१९५ किलोमीटरचे अंतर २ तास ७ मिनिटे आणि ५० सेकंद अशा वेळेसह पूर्ण करत ‘एलिट’ पुरुष गटात अग्रस्थान मिळवले. परंतु गतवर्षीच्या विक्रमी वेळेपासून तो १८ सेकंद दूर राहिला. महिलांमध्ये अबेराशने २ तास २६ मिनिटे आणि ०६ सेकंद अशा वेळेची नोंद करत जेतेपद मिळवले. गतवर्षी अंचलेम हेमानोतने विक्रमी २ तास २४ मिनिटे आणि १५ सेकंद अशा वेळेसह बाजी मारली होती. यंदा मात्र हेमानोतला (२ तास २९ मिनिटे ५८ सेकंद) सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
हेही वाचा >>>IND vs ENG : इंग्लंड संघाला मोठा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून झाला बाहेर
‘एलिट’ गटात भारतीयांमध्ये श्रीनू बुगाथा (२ तास १७ मिनिटे २९ सेकंद) पुरुषांमध्ये, तर निरमाबेन भारतजी ठाकोर (२ तास ४७ मिनिटे ११ सेकंद) महिलांमध्ये विजयी ठरले. ऑलिम्पिकपटू आणि गतविजेत्या गोपी थोनाक्कलला यंदा दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याने २ तास १८ मिनिटे आणि ३७ सेकंद अशा वेळेत मॅरेथॉन पूर्ण केली. शेर सिंह तन्वर (२ तास १९ मिनिटे ३७ सेकंद) तिसऱ्या स्थानावर आला. महिलांमध्ये रेश्मा केवाते (३ तास ३ मिनिटे ३४ सेकंद) आणि श्यामली सिंग (३ तास ४ मिनिटे ३५ सेकंद) यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले.
‘एलिट’ गटात पुरुषांमध्ये हेमानोत अलेव (२ तास ९ मिनिटे ०३ सेकंद) दुसऱ्या, तर मितकू ताफा (२ तास ९ मिनिटे ५८ सेकंद) तिसऱ्या स्थानावर आले. महिलांमध्ये मुलुहाबत सेगा (२ तास २६ मिनिटे ५१ सेकंद) आणि मेदहिन बेईने (२ तास २७ मिनिटे ३४ सेकंद) यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले. पुरुषांमध्ये अव्वल तीनही धावपटूंनी ३० किमीचे अंतर १ तास ३१ मिनिटे ०५ सेकंदांत पूर्ण केले होते. मात्र, अखेरच्या काही किलोमीटरमध्ये लेमीने आपला वेग वाढवला आणि सलग दुसऱ्यांदा मॅरेथॉन जिंकली.
मुंबई मॅरेथॉन जिंकताना लेमी आणि अबेराश यांनी प्रत्येकी ५० हजार अमेरिकन डॉलरचे (साधारण ४१ लाख ५६ हजार रुपये) बक्षीस आपल्या नावे केले. तसेच भारतीयांमध्ये अव्वल स्थान पटकावलेल्या धावपटूंना पाच लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले. भारतीयांमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील धावपटूंनी अनुक्रमे चार लाख आणि तीन लाख रुपयांचे बक्षीस कमावले.
अमृता पटेल, सावर बरवाल अर्ध-मॅरेथॉनचे विजेते
’ अर्ध-मॅरेथॉनच्या खुल्या महिला गटात अमृता पटेल व पुरुष गटात सावन बरवाल विजेते ठरले.
’ अमृताने २१.०९७ किलोमीटरचे अंतर १ तास १९ मिनिटे २० सेकंदात पूर्ण केले. पूनम सोनूने (१ तास १९ मिनिटे २० सेकंद) आणि कविता यादव (१ तास २० मिनिटे ४५ सेकंद) यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले.
’ पुरुष गटात बरवालने १ तास ०५ मिनिटे ०७ सेकंद वेळ नोंदवत अर्ध-मॅरेथॉनचे जेतेपद मिळवले. किरण म्हात्रे (१ तास ०६ मिनिटे २४ सेकंद) दुसऱ्या आणि मोहन सैनी (१ तास ६ मिनिटे ५५ सेकंद) तिसऱ्या स्थानी राहिला.
सुरुवातीला वातावरण चांगले होते. मात्र, ३५ किमीनंतर उष्णता वाढत गेली व त्यामुळे थोडे आव्हान निर्माण झाले. त्यातूनही मार्ग काढत मी सर्वोत्तम कामगिरी केली याचे निश्चित समाधान आहे. – हायले लेमी
मॅरेथॉनमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न होता आणि त्यामध्ये यशस्वी झाल्याने मी आनंदी आहे. ४० किमीनंतर थोडा त्रास झाला, पण मी धावण्यामध्ये सातत्य राखले. त्यामुळेच मला मॅरेथॉन जिंकता आली. – अबेराश मिन्सेवो
माझा प्रयत्न विक्रमी कामगिरी करण्याचा होता. मात्र, अखेरचे पाच किलोमीटरचे अंतर पार परताना मला अडचणींचा सामना करावा लागला. यावेळी मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी अनुकूल वातावरण होते. त्याचा फायदा मला झाला. – श्रीनू बुगाथा
मी २०२०मध्ये मुंबई मॅरेथॉनमध्ये पहिल्यांदा सहभाग नोंदवताना पाचवे स्थान मिळवले होते. यावेळी जेतेपद मिळवण्याचे माझे ध्येय होते. हे ध्येय गाठल्याला मला आनंद आहे. – निरमाबेन ठाकोर
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.