अचंता शरथ कमल,भारताचा टेबल टेनिसपटू
सुप्रिया दाबके
भारताला टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये सांघिक प्रकारात पदक मिळेल, असा विश्वास भारताचा अव्वल टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमलने व्यक्त केला.
‘‘टेबल टेनिसच्या देशातील पायाभूत सुविधा सुधारत आहे. महिलांमध्ये मनिका बात्रा चांगली कामगिरी करते आहे. २०१६ मध्ये ती रिओ ऑलिम्पिकला पात्र ठरली होती. २०१८ची राष्ट्रकुल स्पर्धा तर तिच्यासाठी सर्वोत्तम होती. ती ज्या वेगाने प्रगती करतेय ते पाहता ती लवकरच जागतिक क्रमवारीत अव्वल १५मध्ये आलेली दिसेल. ऑलिम्पिक, राष्ट्रकुल स्पर्धामध्ये पदकविजेती कामगिरी करण्याची तिची सर्वाधिक क्षमता आहे,’’ असे अचंताने सांगितले.
भारताचे टेबल टेनिसपटू ऑलिम्पिकला पात्र ठरण्याच्या दृष्टीने जोमाने तयारी करत आहेत. २० ते २६ जानेवारीदरम्यान पोर्तुगाल येथे ऑलिम्पिकची पात्रता फेरी होणार आहे. त्यातून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी भारताचे टेबल टेनिसपटू प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. या पाश्र्वभूमीवर अचंताशी केलेली खास बातचीत-
* चेन्नईत नुकत्याच झालेल्या सराव शिबिराविषयी काय सांगशील?
सर्व खेळाडूंनी एकत्र सराव करावा, हा भारतीय टेबल टेनिस संघटनेचा उद्देश होता. कारण गेले तीन ते चार महिने आम्हाला एकत्र सराव करता आला नव्हता. कारण खेळाडू विविध स्पर्धामध्ये व्यग्र होते. कारण पोर्तुगालमध्ये २० ते २६ जानेवारीदरम्यान ऑलिम्पिक पात्रता फेरी होणार आहे. पुरुष दुहेरीने या स्पर्धेची सुरुवात होईल. त्यासाठी दुहेरीच्या जोडय़ांची आखणी करत आहोत. आम्ही चांगल्या लयीत आहोत. चेन्नईत शिबीर झाले. आता जर्मनीतही १३ ते २० जानेवारीला सराव शिबीर आहे. ऑलिम्पिकला पात्र ठरू आणि सांघिक प्रकारात पदक जिंकू, असा विश्वास आहे.
* पूर्णवेळ प्रशिक्षकाची उणीव भारतीय संघाला भासते आहे का?
नवीन प्रशिक्षकांचा शोध सुरू आहे. भारतीय प्रशिक्षकासाठी पहिली पसंती आहे. कारण आमच्यातील कच्चे दुवे हे भारतीय प्रशिक्षकांना परदेशी प्रशिक्षकापेक्षा चांगल्या तऱ्हेने ठाऊक असतात. ते पाहता भारतीय प्रशिक्षकाची नेमणूक ऑलिम्पिकच्या दृष्टीने करण्यासाठी टेबल टेनिस संघटनेचा प्रयत्न सुरू आहे.
* ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी अव्वल तीनमध्ये असणे आवश्यक आहे, असे तू नेहमी म्हणतो?
हो, २००४, २००८ आणि २०१६ या तीन ऑलिम्पिकमध्ये मी खेळलो आहे. त्यातच सध्या आमचे जागतिक क्रमवारीत आठवे स्थान आहे. आशिया क्रीडा स्पर्धेत सातवे मानांकन होते. मात्र तरीदेखील कांस्यपदक मिळाले. यंदा टोक्यो ऑलिम्पिकमध्ये १६ संघ आहेत. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी सुरुवातीच्या तीन फेऱ्या जिंकाव्या लागतात. अर्थातच हे सर्व कठीण आहे, पण तरीदेखील आम्हाला सांघिक प्रकारात पदकाची अपेक्षा आहे.
* ‘अल्टिमेट टेबल टेनिस लीग’मुळे नव्या दमाच्या खेळाडूंना कसा फायदा झाला?
फक्त साथियनच नाही तर हरमीत देसाई, अॅँथनी अमलराज, मानव ठक्कर हे सर्व गेल्या काही वर्षांमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. कोरिया, जर्मनी, जपान, तैपेई या देशांचे खेळाडू अव्वल क्रमांकांवर आहेत. यापूर्वी मी एकटाच या सर्वाना आंतरराष्ट्रीय स्तरावर टक्कर द्यायचो. मात्र आता माझ्यासोबत हे भारताचे सर्व खेळाडू आहेत. विशेष करून २०१६ रिओ ऑलिम्पिकला आम्ही भारताचे चार टेबल टेनिसपटू पात्र ठरलो होतो. तेव्हाच आमची ताकद सर्वाना कळली होती. अर्थातच त्यानंतर आम्हाला भारतीय क्रीडा प्राधिकरणाची (साई) मदत झाली. भारतीय टेबल टेनिस संघटनेचे पाठबळ मिळाले. अखेर आमच्या युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटूंसोबत खेळण्याचा सर्वाधिक अनुभव हा ‘अल्टिमेट टेबल टेनिस लीग’मुळे (यूटीटी) मिळाला. कारण थेट आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळण्याची संधी आमच्या युवा टेबल टेनिसपटूंना मिळाली. मानव ठक्कर, अर्चना कामतसारखे गुणवान यूटीटीमुळे पुढे आले.