भारतीय क्रिकेट संघ तब्बल २८ वर्षांनंतर २०११ मध्ये दुसऱ्यांदा एकदिवसीय सामन्यात विश्वविजेता ठरला. भारतीय संघासाठी हा विश्वचषक फारच महत्त्वपूर्ण होता. क्रिकेटचा देव म्हणून ओळख प्रस्थापित केलेल्या सचिनच्या क्रिकेट कारकिर्दितील तो अखेरचा विश्वचषक होता. विश्वचषक जिंकून सचिनला खास गिफ्ट द्यावे, असे स्वप्न त्यावेळी धमाकेदार फॉर्ममध्ये असणाऱ्या युवराज सिंगने पाहिले होते. विश्वचषक उंचावल्यानंतर त्याने हे बोलून देखील दाखवले. एकूणच श्रीलंकेला नमवत वानखेडेच्या मैदानावर भारताने क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णअक्षराने विश्वचषकावर नाव कोरले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रिकेटमध्ये मैदानातील कामगिरीनं खेळाडू प्रकाश झोतात येतात. मात्र, या यशात अनेक चेहरे पडद्यामागे देखील परिश्रम घेत असतात. भारताच्या विश्वचषकाच्या यशात देखील प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांचे योगदान असेच काहीसे होते. संघातील खेळाडूंप्रमाणेच त्यांच्या योगदानालाही नाकारता येत नाही. गॅरी यांचा आज वाढदिवस आहे. याच निमित्ताने भारतीय संघाच्या मोठ्या यशातील त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकण्याचा एक प्रयत्न…

भारतीय क्रिकेट संघाने २८ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा एकदिवसीय क्रिकेटमध्ये विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचे गॅरी कर्स्टन हे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी होते. भारताने विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंनी सचिननंतर कर्स्टन यांना खांद्यावर घेऊन मिरवले हिच त्यांच्या योगदानाची खरी पोहोच पावती होती. कदाचित हा क्षण ते कधीच विसरणार नाहीत

कर्स्टन यांच्यापूर्वी जॉन राईट, ग्रेग चॅपेल या विदेशी क्रिकेटपटूंनी भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवले, पण कर्स्टन (२००८ ते २०११) यांची कारकीर्द मात्र विशेष उल्लेखनीय ठरली. कर्स्टन यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारतीय संघाने कसोटी आणि वन-डे क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकावले. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी यांच्यासारख्या स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतीय संघाचे प्रशिक्षकपद यशस्वीपणे सांभाळण्याचे कौशल्य कर्स्टन यांनी पार पाडले.

१९९३ मध्ये वयाच्या २६ व्या वर्षी कसोटी पदार्पण करणारे कर्स्टन दक्षिण आफ्रिका संघातर्फे १०० कसोटी खेळणारे पहिले क्रिकेटपटू ठरले. २००३ च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघाचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आल्यानंतर कर्स्टन यांनी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यांनी १८५ एकदिवसीय सामन्यात ६,७९८ धावा फटकावल्या. त्यात १३ शतकांचा समावेश आहे. २००४ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या कर्स्टन यांनी १०१ कसोटीत दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करताना ७,२८९ धावा फटकावल्या. त्यात २१ शतकी खेळींचा समावेश आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer indian coach gary kirsten indian cricket team world cup
First published on: 23-11-2017 at 15:54 IST