बार्सिलोना येथील कॅम्प नाऊ स्टेडियमवर ९६,२९० प्रेक्षकांच्या उपस्थितीत यजमान बार्सिलोना क्लबने चमत्कार केला. चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीच्या पॅरिस सेंट-जर्मेनविरुद्धच्या पहिल्या लीग लढतीत ४-० असा पराभव पत्करावा लागल्यामुळे बार्सिनोलाचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश हा जवळपास अवघडच होता. मात्र, बुधवारी मध्यरात्री जे घडले, त्याचा विचार कुणाच्याही ध्यानीमनी नसावा. बार्सिलोनाच्या प्रत्येक खेळाडूने परतीच्या लढतीत अक्षरश: जीव ओतून खेळ केला आणि त्यांच्या या जिद्दीसमोर पराभवालाही नतमस्तक व्हावे लागले. बार्सिलानाने ०-४ अशा पिछाडीवरून अनपेक्षित मुसंडी मारून ६-१ असा दणदणीत विजय नोंदवला आणि ६-५ अशा गोलफरकाच्या जोरावर उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

‘‘संपूर्ण कारकीर्दीत खेळलेला हा सर्वोत्तम सामना होता. हा विजय आमच्यासाठी विशेष आहे. या सामन्यातील अनुभव आयुष्यभर सोबत राहील. आम्ही इतिहास घडविला, याची जाण मला आहे; पण असा संघ असल्यावर काहीच अशक्य वाटत नाही,’’ असे मत या सामन्यात दोन गोल करणारा नेयमार म्हणाला. या विजयाने १९९९ साली कॅम्प नाऊ येथे मँचेस्टर युनायटेडने चॅम्पियन्स लीगच्या अंतिम लढतीत भरपाई वेळेत दोन गोल करून बायर्न म्युनिचवर मिळवलेल्या अविस्मरणीय २-१ अशा विजयाची आठवण करून दिली. २००५ च्या अंतिम लढतीतही लिव्हरपूलने पहिल्या सत्रातील ०-३ अशा पिछाडीवरून मुसंडी मारताना सामना ३-३ असा बरोबरीत आणत पेनल्टी शूटआऊटमध्ये बाजी मारली.

‘‘हा विजय शब्दात मांडणे कठीण आहे. हा एक भयपट होता, नाटकासारखा होता आणि तो कॅम्प नाऊ येथे खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून मी क्वचितच अनुभवला होता.

प्रेक्षकांनी खेळाडूंवर दाखवलेल्या विश्वासाचा हा विजय आहे,’’ असे बार्सिलोनाचे प्रशिक्षक लुईस एन्रिक यांनी सांगितले.

बुधवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत लुईस सुआरेझ (३ मि.), लिओनेल मेस्सी (५० मि.) व सेर्गी रॉबेटरे (९० मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. नेयमारने (८८ व ९० मि.) दोन गोल करून विजयात सिंहाचा वाटा उचलला. मात्र, भरपाई वेळेत निर्णायक गोल करणारा रॉबेटरे हा या विजयाचा नायक ठरला.

मी सर्वस्व झोकून दिले होते. पॅरिसमधून मानहानिकारक पराभव सोबत घेऊन परतल्यानंतर मिळवलेला हा विजय अविस्मरणीय आहे. या सामन्यासाठी आम्ही सज्ज होतो. प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे अतिरिक्त दहा खेळाडूंची साथ आम्हाला मिळाली. हा विजय त्यांना समर्पण.

सेर्गी रॉबेटरे