इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) दिल्ली डायनामोस एफसी आणि एफसी पुणे सिटी यांच्यातील सामना अनिर्णित राहीला. दोन्ही संघांतील खेळाडूंनी विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण सामना अखेर गोलशून्य बरोबरीत राहीला. आयएसएलमधील अनिर्णित ठरलेला हा पहिला सामना आहे.
दिल्लीच्या संघाने पुण्याच्या संघापेक्षा चांगला खेळ केला असला तरी त्यांच्या नशिबामध्ये गोल नव्हता. इटलीचा महान खेळाडू अलेसांड्रो डेल पिएरोला दिल्लीच्या संघाने ३७ व्या मिनिटाला मैदानात उतरवले आणि एकच जल्लोष झाला. पण प्रेक्षकांच्या अपेक्षापूर्ती डेल पिएरोला करता आली नाही.
दिल्लीने ब्राझीलच्या गुस्ताव्हो डोस सांतोसला अखेरच्या काही मिनिटांमध्ये बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरवले. सांतोसने काही मिनिटांतच गोल करण्याचा प्रयत्न केला, पण त्यामध्ये त्याला अपयश आले. त्याच्या पाच मिनिटांपूर्वी डेल पिएरोने उत्तम ‘फ्री-किक’ लगावली खरी, पण त्याचा फायदा हॅन्स मुल्डरला उचलता आला नाही. सामन्याच्या अखेरपर्यंत दिल्लीने पुण्याच्या गोलपोस्टवर हल्ला केला, पण त्यांना गोल करण्यात यश आले नाही.
सामन्याच्या ३९ व्या मिनिटाला पिएरोने चेंडूवर ताबा मिळवत गोल करण्याचा प्रयत्न केला, पण तो पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्यानंतर मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना आक्रमक खेळ करता आला नाही.
‘‘संपूर्ण सामन्याचा आनंद मी लुटला. मैदानावर उतरल्यानंतर आणि खेळत असताना भारतीय चाहत्यांकडून माझ्या नावाचा जयघोष सुरू होता. हा क्षण खूपच अविस्मरणीय असा आहे. मला पाठिंबा दिल्याबद्दल मी भारतीय चाहत्यांचा आभारी आहे. पण माझ्या चाहत्यांसाठी हा सामना जिंकू न शकल्याचे दु:ख मला होत आहे. संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवले, पण गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालवल्या,’’ असे डेल पिएरो याने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 15th Oct 2014 रोजी प्रकाशित
इंडियन सुपर लीग : अशी ही बरोबरी!
इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) दिल्ली डायनामोस एफसी आणि एफसी पुणे सिटी यांच्यातील सामना अनिर्णित राहीला. दोन्ही संघांतील खेळाडूंनी विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण सामना अखेर गोलशून्य बरोबरीत राहीला.

First published on: 15-10-2014 at 01:52 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fc pune city hold delhi dynamos to a goalless draw