नवी दिल्ली : कझाकस्तानची ग्रँडमास्टर झान्साया अब्दूमलिकने स्पर्धा स्थळावरील गैरसोयींमुळे माघार घेतल्याने शनिवारपासून सुरू होणारी महिलांची ‘फिडे’ नवी दिल्ली ग्रँड प्रिक्स बुद्धिबळ स्पर्धा लांबणीवर पडली. खेळाडूंनी पत्र लिहून ही स्पर्धा पुढे ढकलण्याची किंवा रद्द करण्याची ‘फिडे’कडे मागणी केली. परंतु स्थानिक आयोजकांनी केलेल्या चुकांसाठी आपण माफी मागत असल्याचे म्हणत ‘फिडे’चे अध्यक्ष अर्कादी द्वोर्कोव्हिच यांनी ही स्पर्धा ११ खेळाडूंसह खेळवली जाणार असल्याचे सांगितले.

२०२२-२३च्या महिलांच्या चार ग्रँड प्रिक्स स्पर्धामधील तिसरी स्पर्धा नवी दिल्ली येथे खेळवली जात आहे. यापूर्वीच्या दोन स्पर्धा अस्ताना आणि म्युनिक येथे झाल्या होत्या. नवी दिल्ली येथील स्पर्धेमधील पहिल्या फेरीचे सामने शनिवारी खेळवले जाणार होते. परंतु अब्दूमलिकने भारतात आल्यानंतर स्पर्धेतून माघार घेतल्याने सामने लांबणीवर पडले. ‘‘खेळाडूंचे २४ मार्चला नवी दिल्ली येथे आगमन झाले. त्यांना विमानतळावरून स्पर्धेच्या ठिकाणी नेण्यासाठी आयोजकांकडून वाहने उपलब्ध नव्हती. खेळाडूंना टॅक्सी कराव्या लागल्या. ‘फिडे’चा एकही अधिकारी नवी दिल्ली येथे नव्हता. खेळाडू हॉटेलमध्ये दाखल झाल्यावर त्यांना खोल्या तयार नसल्याचे सांगण्यात आले. ही परिस्थिती पाहून अब्दूमलिकने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला,’’ अशी माहिती फ्रान्समधील एका संकेतस्थळाने दिली. द्वोर्कोव्हिच यांनी या परिस्थितीसाठी माफी मागितली. मात्र, एका खेळाडूच्या माघारीमुळे स्पर्धा रद्द करण्याचा पायंडा पाडता येणार नाही, असे म्हणताना त्यांनी स्पर्धा खेळवण्याची सूचना केली.