फिफा विश्वचषक फुटबॉल स्पध्रेतील रंगतदार सामन्यांबरोबरच उपांत्य फेरीत कोणते संघ पोहोचणार ही उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे.  सट्टेबाजाराने हा फैसला आधीच करून टाकला आहे. त्यांच्या मते अर्थात ब्राझील आणि जर्मनी हे दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. अशा रीतीने त्यांनी भाव जाहीर केले आहेत. बुधवारी याच सदरात ४ जुलै रोजी फ्रान्स-जर्मनी आणि ब्राझील-कोलंबिया यांच्यातील भाव दिले होते. आता सामना सुरू होण्यापूर्वीचे भावही दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी फ्रान्सबद्दल विश्वास न वाटणाऱ्या सट्टेबाजांनी फ्रान्सला सुधारित भाव दिला आहे. बुधवारी असलेला फ्रान्सचा भाव दोन रुपयांवरून सव्वा रुपयांवर पोहोचला आहे. जर्मनीच्या भावात काहीही बदल नाही. कोलंबियाकडून कडवी झुंज अपेक्षित असल्यामुळे ब्राझीलचा भाव घसरला आहे. ३५ पैशांवरून ९० पैसे झाला आहे तर कोलंबिया साडेतीन रुपयांवरून पावणेदोन रुपये. याचा अर्थ कोलंबिया चमत्कार करू शकते, असे सट्टेबाजांना वाटते. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आता अर्जेटिनाने उडी मारली आहे. आंतरराष्ट्रीय सट्टाबाजारातही हाच कल आहे. बेटविन, बेट ३५६, पॅडी पॉवर, बेट विक्टर, विलियम्स आदी संकेतस्थळांवर अर्जेटिनाचा भाव वधारल्याचे दिसत आहे. सर्वाधिक गोलकर्ते म्हणून अद्यापही मेस्सीलाच सट्टेबाजांची साथ आहे. त्यापाठोपाठ जेम्स रॉड्रिगेझ, नेयमार, थॉमस म्युलर, रॉबिन व्हॅन पर्सी आहेत. ब्राझील-कोलंबिया या सामन्यात पंटर्सना चमत्काराची आशा वाटत आहे. मात्र तसे झाल्यास सट्टेबाजांना मोठा फटका बसेल. पण ते शक्य नाही. ब्राझीलच जिंकणार, असाच त्यांचा होरा आहे.
आजच्या सामन्यांचे अंतिम भाव :
फ्रान्स     जर्मनी
सव्वा रुपया (११/५)    ४५ पैसे (६/४)
ब्राझील    कोलंबिया
९० पैसे (५/६)     पावणेदोन रुपये (७/२)
निषाद अंधेरीवाला

अमेरिकेचे संरक्षणमंत्री.. टिम होवार्ड!
अमेरिकेचा गोलरक्षक टिम होवार्ड यांनी बेल्जियमविरुद्धच्या बाद फेरीच्या सामन्यात तब्बल १६ गोल वाचवल्यामुळे त्याने सर्वाचीच वाहवा मिळवली आहे. त्याला नेटप्रेमींनी नानाविध रूपात सादर केले आहे. कुणी त्याला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनवले आहे तर कुणी त्याचा फोटो अमेरिकेच्या चलनावर लावला आहे, तर कुणी त्याला माउंट रशमोर या शिल्पातील चार जणांमध्ये स्थान दिले आहे. पण एका चाहत्याने विकीपिडियावरील माहितीत बदल करून अमेरिकेचे संरक्षणमंत्री असलेल्या चक हगेल यांने नाव काढून चक्क टिम होवार्डचे नाव टाकण्याचा प्रकार केला होता. जगभरातील नेटप्रेमींसाठी ही एक वेगळीच पर्वणी होती. पण त्यानंतर ही माहिती बदलण्यात आली. अमेरिकेच्या सुरक्षा विभागाचे सचिव चक हगेल यांनी गोलरक्षक टिम होवार्डला शुभेच्छा देण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर नेटप्रेमींनी याविषयी असंख्य विनोद निर्माण केले होते.
फुटबॉलरंगी रंगले श्वान!
विश्वचषकाचा ज्वर आता जगभरात जाणवू लागला आहे. फोर्टालेझा येथे शुक्रवारी ब्राझील आणि कोलंबिया यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना रंगणार आहे. या सामन्याच्या पाश्र्वभूमीवर कोलंबियाचे फुटबॉलप्रेमी रसिक नव्हे, तर श्वानही देशाची जर्सी परिधान करून ‘फुटबॉलरंगी’ रंगले आहेत.