विश्वचषक फुटबॉल स्पध्रेच्या सामन्यांची बेकायदेशीर तिकीट विक्री केल्याप्रकरणी फिफाच्या भागीदार कंपनीच्या संचालकांना अटक करण्यात आली आहे. मॅच हॉस्पिटॅलिटीचे संचालक रे व्हिलॅन यांना रिओ दी जानिरोच्या समुद्रकिनाऱ्यावरील पंचतारांकित कोपाकॅबाना पॅलेस हॉटेलमधून सोमवारी अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वी तिकिटांच्या काळा बाजारप्रकरणी ब्राझीलच्या पोलिसांनी ११ जणांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर या प्रकरणाच्या सूत्रधाराचा शोध सुरू होता.
या तपास प्रकरणाचे प्रमुख फॅबिओ बारूके यांनी सांगितले की, ‘‘तिकिटांचे वाटप चुकीच्या पद्धतीने करून बेकायदेशीरपणे विक्री आणि गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप व्हिलॅन यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणात ते दोषी आढळल्यास त्यांना चार वष्रे तुरुंगवासाची शिक्षा होईल.
स्थानिक प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, व्हिलॅन हे ६४ वर्षीय ब्रिटिश नागरिक आहेत. त्यांच्या हॉटेलमधील खोलीमधून सुमारे १०० तिकिटे पोलिसांनी जप्त केली आहेत. ब्राझील आणि जर्मनी यांच्यातील पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला व्हिलॅन यांना अटक झाली. पण तिकिटांच्या बेकायदेशीर विक्री प्रकरणामुळे फिफाची प्रतिमा डागाळली आहे.