फुटबॉल विश्वचषक २०२२ (फिफा विश्वचषक) रविवार, 20 नोव्हेंबरपासून कतारमध्ये सुरू झाला आहे. मात्र यादरम्यान फुटबॉलप्रेमींमध्ये एक वेगळाच उत्साह आणि प्रचंड प्रेम पाहायला मिळत आहे. भारत फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळत नसला तरी त्याची क्रेझ काही कमी नाही. केरळमधील कोची येथील काही फुटबॉल चाहत्यांनी फिफा विश्वचषक पाहण्यासाठी चक्का २३ लाख रुपयांचे घर विकत घेतले आहे. यावरूनच फुटबॉलची क्रेझ काय आहे याचा अंदाज लावता येतो.

विशेष म्हणजे, कोची जिल्ह्यातील मुंडक्कामुगल गावातील १७ फुटबॉल चाहत्यांनी त्यांच्या गावात फुटबॉल सामने पाहण्यासाठी घर विकत घेतले आहे. फक्त कारण एकच, ते सर्व एकत्र बसून सामना पाहू शकत होते. या घराची किंमत २३ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व चाहत्यांनी यासाठी पैसे खर्च केले आहेत. एवढेच नाही तर या सर्वांनी खरेदी केलेले घर ब्राझील, अर्जेंटिना आणि पोर्तुगालच्या रंगात रंगवले आहे. विशेषत: यातील काही अर्जेंटिनाचा जादूगार लिओनेल मेस्सी तर काही पोर्तुगालचा स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोचे चाहते आहेत. याशिवाय या फुटबॉल चाहत्यांनी इतर अनेक खेळाडू आणि संघांचे कटआउट्सही घरावर लावले आहेत.

मीडियाशी बोलताना एका चाहत्याने सांगितले की, “आम्ही फिफा वर्ल्ड कप २०२२ साठी काहीतरी खास करण्याचा विचार केला होता. आमच्यापैकी १७ जणांनी हे घर २३ लाख रुपयांना आधीच घेतले होते. ते फिफा संघांच्या झेंड्यांनी सजवलेले आहे. आम्ही या घरात एक मोठा टीव्ही देखील लावला आहे, जिथे आम्ही सर्व एकत्र बसून सामन्यांचा आनंद घेतो.”

हेही वाचा – Fifa World Cup 2022: रोनाल्डो-मेस्सीच्या बुद्धिबळ खेळतानाच्या व्हायरल फोटोवर कोहलीची कमेंट, म्हणाला…!

चाहत्यांनी पुढे सांगितले की, ”आमच्यापैकी १७ जण रोज संध्याकाळी इथे जमायचे. दरम्यान, घरमालकाने मालमत्ता विकण्याची योजना आखली आहे. तेव्हा आम्ही विचार केला की, हे घर का घेऊ नये? आता आम्ही एकत्र बसून विश्वचषक एकत्र पाहू शकतो.”