अल वाकराह : कॅमेरूनमध्ये जन्मलेल्या, पण स्विर्त्झंलडमध्ये स्थायिक झालेल्या ब्रील एम्बोलोने या दोन संघांमधील ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यात निर्णायक भूमिका बजावली नसती, तरच नवल. उत्तरार्धात एम्बोलोने केलेल्या गोलच्या जोरावर गुरुवारी झालेल्या विश्वचषकातील ग-गटाच्या सामन्यात स्विर्त्झंलडने कॅमेरूनवर १-० अशी सरशी साधली.
आघाडीपटू एम्बोलोने ४८व्या मिनिटाला सामन्यातील एकमेव गोल केला. कॅमेरूनला आदर दाखवण्यासाठी एम्बोलोने गोल केल्यानंतर जल्लोष करणे टाळले. त्याने केवळ स्टेडियममध्ये उपस्थित स्विस चाहत्यांना अभिवादन केले. त्यानंतर विरुद्ध दिशेला बसलेल्या कॅमेरूनच्या चाहत्यांची हात वर करून त्याने माफी मागितली. एम्बोलो पाच वर्षांचा असताना त्याचे कुटुंब कॅमेरूनमधून फ्रान्समध्ये वास्तव्यास गेले. तेथे काही काळ राहिल्यानंतर त्यांनी स्विर्त्झंलडमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे २५ वर्षीय एम्बोलोसाठी हा सामना विशेष ठरला.
