टेनिस स्पर्धेच्या अंतिम टप्प्यांमध्ये एकामागून एक मोठे खेळाडू पराभूत होताना आपण नेहमीच पाहतो, पण ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी साऱ्यांनाच जोरदार धक्का बसला तो महिला एकेरीमध्ये अॅना इव्हानोव्हिकच्या पराभवाने.
पुरुष एकेरीमध्ये मात्र रॉजर फेडरर, राफेल नदाल या बलाढय़ खेळाडूंनी विजयी सलामी दिली. भारताच्या युकी भांब्रीला बलाढय़ खेळाडू अँडी मरेविरुद्ध चिवट लढतीनंतर पराभव स्वीकारावा लागला.
शारीरिक तंदुरुस्तीच्या समस्यांनी ग्रासलेल्या नदालला गेल्या वर्षी विम्बल्डन स्पर्धेनंतर फारसे यश मिळविता आले नव्हते. त्यामुळे त्याच्या कामगिरीबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. नदालने रशियाच्या मायकेल युझिनीचा ६-३, ६-२, ६-२ असा दणदणीत पराभव करीत आपण विजेतेपदाचे दावेदार आहोत याची झलक दिली. या स्पर्धेच्या पाचव्या विजेतेपदासाठी उत्सुक असलेल्या फेडररने चीन तैपेईचा खेळाडू येन सुनलिऊचा ६-४, ६-२, ७-५ असा सरळ तीन सेट्समध्ये पराभव केला. बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हने जर्मनीच्या डस्टिन ब्राऊनचा ६-२, ६-३, ६-२ असा केवळ ६९ मिनिटांमध्ये पराभव केला.
जागतिक क्रमवारीतील माजी अग्रमानांकित खेळाडू इव्हानोव्हिकला चेक प्रजासत्ताकच्या ल्युसी ऱ्हादेकाने १-६, ६-३, ६-२ असे पराभूत केले. इव्हानोविकने २००८ मध्ये फ्रेंच स्पर्धा जिंकली होती. अँजेलिक क्रेबर या जर्मन खेळाडूलाही पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. रुमानियाच्या इरिना कॅमेला बेगू हिने तिच्यावर ६-४, ०-६, ६-१ अशी मात केली. माजी विजेत्या मारिया शारापोवाने धडाकेबाज प्रारंभ करताना क्रोएशियाच्या पेत्रा मार्टिकला ६-४, ६-१ असे पराभूत केले. जर्मिला गाजदोसोवा या स्थानिक खेळाडूने ग्रँड स्लॅम स्पर्धेत विजयाची बोहनी केली. तिने रुमानियाच्या अॅलेक्झांड्रा दुलघेरूला ६-३, ६-४ असे सहज हरविले.
तो हरला, तो जिंकला!एकेरीत भारताचा एकमेव शिलेदार असलेल्या युकी भांब्रीची पहिल्याच फेरीत दोन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या अँडी मरे याच्याशी लढत होती. या सामन्यात मरे विजयी होणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. पण भांब्रीने त्याचे कोणतेही दडपण न घेता मरेला कौतुकास्पद लढत दिली. चुरशीने झालेला हा सामना मरेने ६-३, ६-४, ७-६ (७-३) असा जिंकला. भांब्री याने पासिंग शॉट्सचा कल्पकतेने खेळ केला, तसेच त्याने बॅकहँडचेही सुरेख फटके मारले.
भांब्रीने या स्पर्धेतील पहिल्या फेरीत पराभव स्वीकारला, मात्र त्याने एकूण ५० हजार ५०० डॉलर्स (३१ लाख १४ हजार रुपये) व ३५ मानांकन गुणांची कमाई केली. तो म्हणाला की, ‘‘मरेविरुद्ध माझा हा पहिलाच सामना होता. मात्र मी कोणतेही दडपण न घेता खेळलो, त्यामुळे मी त्याला चांगली झुंज देऊ शकलो. या सामन्यातील खेळाबद्दल मी समाधानी आहे.’’
मरेने भांब्रीच्या खेळाचे कौतुक करीत सांगितले की, ‘‘युकीमध्ये पहिल्या शंभर क्रमांकांमध्ये स्थान मिळविण्याची क्षमता आहे. आता तो जरी तीनशे क्रमांकाच्या आसपास असला तरी या वर्षांअखेरीस तो पहिल्या दीडशे खेळाडूंमध्ये स्थान मिळवील अशी मला खात्री आहे. त्याच्याविरुद्ध मी प्रथमच खेळत होतो. त्याचा खेळ पाहून मी भारावून गेलो.’’