गेल्या महिन्यात इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय क्रिकेट संघातील मार्गदर्शक सदस्यांना करोनाची लागण झाल्यामुळे स्थगित करण्यात आलेला पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना पुढील वर्षी जुलै महिन्यात खेळवण्यात येणार आहे.

भारतीय संघ पुढील वर्षी मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी इंग्लंड दौऱ्यावर जात असून, १ जुलैपासून हा कसोटी सामना सुरू होईल. मँचेस्टरऐवजी एजबॅस्टन येथे हा सामना होणार आहे, अशी माहिती इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने दिली आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह भारताच्या मार्गदर्शक फळीतील काही सदस्यांना करोनाची लागण झाल्यामुळे संघातील खेळाडूंनी मैदानावर उतरण्यास नकार दिल्यामुळे हा सामना खेळवण्यात आला नाही. भारतीय संघ चार कसोटी सामन्यांनंतर २-१ असा आघाडीवर होता.

‘‘भारत-इंग्लंड कसोटी सामन्याची पुन्हा आखणी करण्यात येईल, तोवर मालिका पूर्ण होणार नाही. हा सामना स्वतंत्रपणे मोजला जाणार नाही. मालिका पूर्ण करण्यासाठी आम्ही बांधील आहोत. २००७नंतर प्रथमच इंग्लंडच्या भूमीवर भारत कसोटी मालिका जिंकेल,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने म्हटले होते.

भारताच्या इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेचा समावेश केल्यामुळे आता मर्यादित षटकांचे सामने सहा दिवस उशिराने सुरू होतील.

  ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तीन सामने ७, ९ आणि १० जुलै रोजी अनुक्रमे एजेब बाऊल, एजबॅस्टन आणि ट्रेंट ब्रिज येथे होणार आहेत.

एकदिवसीय मालिकेतील तीन सामने १२, १४ आणि १७ जुलै रोजी अनुक्रमे दी ओव्हल, लॉडर्स आणि ओल्ड टॅ्रफर्ड येथे होणार आहेत.