फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा
ऑस्ट्रियाचा प्रतिभावान टेनिसपटू डॉमिनिक थीमने शनिवारी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. संघर्षपूर्ण अंतिम सामन्यात थीमने सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचवर सरशी साधली. रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत २०१८ प्रमाणेच राफेल नदाल विरुद्ध थीम एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत.
तब्बल चार तास आणि १३ मिनिटे रंगलेल्या अंतिम सामन्यात चौथ्या मानांकित थीमने अग्रमानांकित जोकोव्हिचवर ६-२, ३-६, ७-५, ५-७, ७-५ असा पाच सेटमध्ये विजय मिळवला. या पराभवामुळे सलग चार ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवण्याचे जोकोव्हिचचे स्वप्न भंगले. जोकोव्हिचने गतवर्षी विम्बल्डन, अमेरिकन, तर वर्षांच्या सुरुवातीस अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदास गवसणी घातली होती.
पाचव्या सेटमध्ये प्रत्येक गुणासाठी दोन्ही खेळाडूंमध्ये संघर्ष पाहायला मिळाला, मात्र ६-५ अशा आघाडीवर असणाऱ्या थीमने लगावलेल्या फोरहँडच्या फटक्याचे जोकोव्हिचकडे काहीही उत्तर नसल्यामुळे थीमच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.