प्रारंभी एकतर्फी आणि उत्तरार्धात चुरस निर्माण झाल्यामुळे अखेरच्या चढाईपर्यंत रंगत आणणाऱ्या लढतीत बंगळुरू बुल्सने तेलुगू टायटन्सचा ३९-३८ असा फक्त एका गुणाने पराभव करून प्रो कबड्डी लीगच्या दुसऱ्या हंगामाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. तर यजमान यू मुंबाने पाटणा पायरेट्सचा ३५-१८ असा सहज पराभव करून सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. वरळीच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात पहिल्या काही मिनिटांतच तेलुगू टायटन्सचा भरवशाचा चढाईपटू सुकेश हेगडेला दुखापत झाली. तर राहुल चौधरी पूर्वार्धात अपयशी ठरला. परिणामी बंगळुरू बुल्सने मध्यंतराला १६-१० अशी एका लोणसह आघाडी घेतली होती.
दुसऱ्या सत्रात आणखी एक लोण चढवून बंगळुरूने १६ गुणांची आघाडी घेतली. परंतु अतिआत्मविश्वासाने खेळणारा बंगळुरूचा संघ गाफील राहिला. यावेळी बंगळुरूच्या चढाईपटूंच्या तीनदा ‘सुपर कॅच’ झाल्या. त्यामुळे तेलुगू टायटन्सने बंगळुरूवर लोण चढवून सामन्यातील चुरस वाढवली. अखेरीस कर्णधार मनजित चिल्लरने आपल्या अनुभवाच्या बळावर संघाला जिंकून दिले. मनजितने आणि अजय ठाकूरने प्रत्येकी ८ गुण मिळवले. तर धर्मराज चेरलाथनने चढायांचे ३ आणि पकडींचे ६ गुण कमावले. दुसऱ्या उपांत्य लढतीत यू मुंबाने पहिल्या सत्रातच दोन लोणसह २२-६ अशी आघाडी घेऊन आपले मनसुबे प्रकट केले. उत्तरार्धात पाटण्याने गुणांचे अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु सुरिंदर नाडा, जीवा कुमार आणि मोहित चिल्लर यांच्या अभेद्य बचावापुढे त्यांचा निभाव लागला नाही.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Aug 2015 रोजी प्रकाशित
बंगळुरूची अंतिम फेरीत यजमान यू मुंबाशी गाठ
प्रारंभी एकतर्फी आणि उत्तरार्धात चुरस निर्माण झाल्यामुळे अखेरच्या चढाईपर्यंत रंगत आणणाऱ्या लढतीत ...

First published on: 22-08-2015 at 01:50 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Final round bengluru vs u mumba