scorecardresearch

राष्ट्रकुल स्पर्धेत महाराष्ट्राच्या क्रीडापटूंना पाचच पदके!

राष्ट्रकुल स्पर्धेत उत्तरेकडील खेळाडूंनी आपले नाणे खणखणीत वाजवले. यातही ईशान्येकडील खेळाडूंनी लक्ष वेधून घेतले,

राष्ट्रकुल स्पर्धेत महाराष्ट्राच्या क्रीडापटूंना पाचच पदके!
राष्ट्रकुल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे १४ खेळाडू सहभागी झाले होते. यामधून केवळ पाच पदके मिळाली.

ज्ञानेश भुरे, लोकसत्ता

पुणे : बर्मिगहॅमला नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत विविध राज्यांच्या क्रीडापटूंनी आपले कौशल्य पणाला लावत भारताला ६१ पदकांसह चौथ्या स्थानापर्यंत नेले. यात पुन्हा एकदा हरयाणाच्या खेळाडूंचा

२३ पदकांसह वरचष्मा राहिला असून, आवश्यक सुविधा आणि सर्वाधिक खर्च करूनही महाराष्ट्राच्या क्रीडापटूंना फक्त पाचच पदके जिंकता आली आहेत.

राष्ट्रकुल स्पर्धेत उत्तरेकडील खेळाडूंनी आपले नाणे खणखणीत वाजवले. यातही ईशान्येकडील खेळाडूंनी लक्ष वेधून घेतले, मात्र महाराष्ट्राचे खेळाडू मागेच राहिले. अ‍ॅथलेटिक्समधील ३,००० मीटर स्टिपलचेस शर्यतीत अविनाश साबळे आणि वेटलिफ्टिंगमध्ये संकेत सरगर यांनी रौप्यपदकांची कामगिरी केली. क्रिकेटमध्ये रौप्यपदक मिळवलेल्या भारतीय संघात जेमिमा रॉड्रिग्ज, स्मृती मानधना आणि राधा यादव यांचा समावेश होता. टेबल टेनिसच्या सांघिक सुवर्णपदक विजेत्या पुरुष संघात सनिल शेट्टीचा समावेश होता, तर चिराग शेट्टीने सात्त्विकसाईराज रंकीरेड्डीच्या साथीने बॅडिमटन दुहेरीत सोनेरी यश मिळवले.

राष्ट्रकुल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे १४ खेळाडू सहभागी झाले होते. यामधून केवळ पाच पदके मिळाली. महाराष्ट्रात खेळाडूंना मिळत असलेल्या सुविधा आणि खेळाडूंवर होणारा खर्च बघता हे यश तुटपुंजे असल्याची भावना क्रीडावर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्राला यश मिळवून देणारे अविनाश आणि संकेत हे दोन्ही खेळाडू ग्रामीण भागांतून आले आहेत, याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही.

राष्ट्रकुल स्पर्धेतील राज्यांचे यश

हरयाणा २३, तेलंगणा ६, पंजाब ५, उत्तर प्रदेश ५, महाराष्ट्र ५, तमिळनाडू ५, बंगाल ४, मणिपूर ३, आंध्र प्रदेश ३, कर्नाटक ३, दिल्ली ३, राजस्थान २, गुजरात २, चंडिगड १, केरळ १

ग्रामीण भागातून खेळाडू पुढे येत आहेत, हे अविनाश आणि संकेतच्या कामगिरीवरून पुन्हा एकदा दिसून आले. राज्याच्या खेळातील प्रगतीसाठी हे नक्कीच चांगले संकेत आहेत. सेनादल जर खेळाडूंना दत्तक घेऊन त्यांना घडवू शकते, तर महाराष्ट्र सरकार का नाही. राज्य सरकार आणि क्रीडा संघटना यांनी एकत्रित येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे, तरच भविष्यात चांगले निकाल मिळतील. 

सुंदर अय्यर, भारतीय टेनिस संघटनेचे सरचिटणीस

महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. आता नाही, तर कधीच नाही अशी वेळ येऊ नये. देशातील पहिली क्रीडा प्रबोधिनी महाराष्ट्रात निर्माण झाली. त्यानंतर अन्य राज्यांत प्रबोधिनी निर्माण झाल्या. इतर राज्यांनी आपला टक्का सुधारला. खेळाडू घडवण्याकडे कल ठेवला, पण महाराष्ट्र अजूनही मागे राहिले. – प्रताप जाधव, माजी राष्ट्रीय खेळाडू आणि भारतीय सायकलिंग महासंघाचे कोषाध्यक्ष

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.