तिरुवनंतपूरम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध निराशा केल्यानंतर भारताच्या गोलंदाजांचे बुधवारपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० क्रिकेट मालिकेत कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकतीच झालेली ट्वेन्टी-२० मालिका भारताने २-१ अशा फरकाने जिंकली. मात्र, अक्षर पटेलचा अपवाद वगळता भारताच्या गोलंदाजांना प्रभाव पाडता आला नाही. वेगवान गोलंदाजांनी अखेरच्या षटकांमध्ये निराशा केली. त्यामुळे आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत जसप्रीत बुमरा, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग यांसारखे गोलंदाज कशी कामगिरी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

या मालिकेसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि अष्टपैलू हार्दिक पंडय़ा यांना विश्रांती देण्यात आली आहे. तसेच करोनाबाधित मोहम्मद शमी या मालिकेलाही मुकणार आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीची मदार क्विंटन डीकॉक, एडिन मार्करम, हान्रिक क्लासन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स यांच्यावर आहे. तसेच कॅगिसो रबाडा, आनरिख नॉर्किए, केशव महाराज यांसारखे गोलंदाज आफ्रिकेकडे आहेत.

कार्तिकला अधिक संधी?

भारताच्या फलंदाजीची भिस्त केएल राहुल, कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्यावर आहे. राहुल, विराट आणि सूर्यकुमार यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकेक अर्धशतक केले. त्यांचा कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न असेल. मधल्या फळीत अष्टपैलू हार्दिकच्या अनुपस्थितीत श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंतपैकी एकाला संघात स्थान मिळू शकेल. तसेच दिनेश कार्तिकला अधिक संधी देण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याला केवळ आठ चेंडू खेळायला मिळाले.

  • वेळ : सायं ७ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, १ हिंदी