राजकोट : कौंटी हंगामातील यशस्वी कामगिरीनंतर मायदेशी परतलेल्या अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराचे शनिवारपासून सुरू होणाऱ्या शेष भारताविरुद्धच्या इराणी चषक क्रिकेट लढतीत सौराष्ट्रकडून दमदार कामगिरी करण्याचे लक्ष्य आहे. तसेच या सामन्यासाठी शेष भारताच्या संघात पाच सलामीवीरांचा समावेश करण्यात आला असून त्यांच्या कामगिरीवरही निवड समितीच्या नजरा असतील.

सौराष्ट्राची मदार प्रामुख्याने पुजारावर असेल. भारताच्या कसोटी संघातील स्थान टिकवून ठेवण्यासाठी पुजाराने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणे गरजेचे आहे. त्यामुळे हा सामना त्याच्यासाठी महत्त्वाचा असेल. इंग्लिश कौंटी स्पर्धेत त्याने सातत्याने धावा केल्या असल्या तरी, आता मायदेशात तो कसा खेळतो यावर निवड समिती लक्ष ठेवून असेल. त्याच्यासमोर उमरान मलिक, कुलदीप सेन या वेगवान गोलंदाजांसह आर. साई किशोर व सौरभ कुमार या फिरकीपटूंचे आव्हान असेल. या सामन्यासाठी निवडलेल्या १५ सदस्यीय शेष भारताच्या संघात प्रियांक पांचाळ, अभिमन्यू ईश्वरन, यशस्वी जैस्वाल, मयांक अग्रवाल व यश धूल या पाच सलामीवीरांचा समावेश आहे. त्यामुळे कोणता फलंदाज कोणत्या क्रमांकावर खेळणार हे शेष भारताला निश्चित करावे लागेल.