‘‘येथे पाहिजे जातीचे, येरा गबाळाचे काम नाही,’’ या तुकारामांच्या ओवी फुटबॉलमधील प्रशिक्षकांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतात. सर्वच खेळांमध्ये खेळाडूंच्या कामगिरीवर संघाचे यशापयश अवलंबून असते. पण फुटबॉलमध्ये नेमके वेगळे घडते. प्रशिक्षक जसे सांगतो, तशाच पद्धतीने खेळाडूंना खेळावे लागते. प्रशिक्षकाने आखलेल्या रणनीती, प्रतिस्पध्र्याच्या चाली मोडून काढण्यासाठीची नीती, कुणाला कोणत्या वेळी संधी द्यायची, कुणाला कोणत्या पोझिशनला खेळवायचे, हे सर्वस्वी प्रशिक्षक ठरवत असतो. जेव्हा संघ विजयी ठरत असतो, तेव्हा त्याचे सर्व श्रेय हे प्रशिक्षकाला जात असते. पण संघ पराभूत होऊ लागला किंवा सारखे अपयश पदरात पडू लागले की प्रशिक्षकाची थेट उचलबांगडी केली जाते. प्रशिक्षकांची तडकाफडकी हकालपट्टी करणे, हे फुटबॉलमध्ये नवे नाही. मँचेस्टर युनायटेडसारख्या जगातील अव्वल संघाच्या प्रशिक्षकपदावरून डेव्हिड मोयेस यांची अवघ्या १० महिन्यांनंतर झालेली हकालपट्टी, हे त्याचेच ताजे उदाहरण.
सर अॅलेक्स फग्र्युसन यांनी आपल्या २६ वर्षांच्या कारकिर्दीत मँचेस्टर युनायटेडला यशोशिखरावर नेऊन ठेवले. संघाची अचूक बांधणी करत एकापेक्षा सरस खेळाडू घडवून फग्र्युसन यांनी मँचेस्टर युनायटेडला इंग्लिश प्रीमिअर लीगची १३ जेतेपदे मिळवून दिली. इंग्लिश प्रीमिअर लीगच्या इतिहासातील हा सर्वाधिक यशस्वी संघ. पण गेल्या वर्षी फग्र्युसन यांनी युनायटेडच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनीच आपला उत्तराधिकारी म्हणून डेव्हिड मोयेस यांची निवड केली. जगातील तिसरा श्रीमंत क्लब, जगातील सर्वाधिक किमतीचा दुसरा क्लब तसेच इंग्लिश फुटबॉलमधील सर्वात यशस्वी क्लब अशी ओळख असलेल्या मँचेस्टर युनायटेडच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे सांभाळणे, हे अग्निदिव्य मोयेस यांना पेलायचे होते. पण ५९ सामन्यांनंतरच डेव्हिड मोयेस यांची युनायटेडच्या प्रशिक्षकपदाची कारकीर्द संपुष्टात आली. खराब व्यवस्थापन, छोटय़ा क्लबमध्ये काम करण्याची मानसिकता, घरच्या आणि बाहेरच्या मैदानांवरील पराभव हीच मोयेस यांच्या गच्छंतीमागची कारणे ठरली.
‘ट्रान्स्फर विंडो’ ही खेळाडूंच्या आयात-निर्यातीची नामी संधी. पण खेळाडूंना विकत घेण्यासाठी अमाप पैसा असतानाही बडय़ा खेळाडूंना संघात सामील करून घेण्यात मोयेस सपेशल अपयशी ठरले. सेस्क फॅब्रेगस, ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि गॅरेथ बॅलेसारख्या खेळाडूंना करारबद्ध करण्यात मोयेस यांचे बरेचसे कष्ट वाया गेले. प्रशिक्षकपदाचा गाढा अनुभव नसलेल्या आणि एव्हरटनसारख्या छोटय़ा क्लबकडून आलेल्या मोयेस यांच्यामुळेच मोठय़ा खेळाडूंनी मँचेस्टर युनायटेड संघात येण्यास प्राधान्य दिले नाही. त्याउलट मोयेस यांनी तंदुरुस्त नसलेल्या बेल्जियमच्या मरौने फेलाइनी याला आणि जानेवारीत जुआन माटासारख्या खेळाडूला करारबद्ध केल्यानंतर मोयेस यांच्यावर बरीच टीका झाली. फग्र्युसन यांनी वेन रूनी याला विकायचे ठरवले होते. पण मोयेस यांनी रूनीला आणखी पाच वर्षांसाठी करारबद्ध केले. त्यामुळे या मोसमात रोनाल्डो, लिओनेल मेस्सी यांच्यासारख्या गोल करणाऱ्या खेळाडूंचा अभाव युनायटेडला जाणवत होता. संपूर्ण मोसमात युनायटेड संघ रूनीसारख्या तंदुरुस्त नसलेल्या तारणहारावर अवलंबून होता. पण खेळलेल्या प्रत्येक सामन्यात रूनीने युनायटेडच्या विजयात हातभार लावला, असे फारच कमी वेळा घडले. गेल्या मोसमात रॉबिन व्हॅन पर्सीने स्वत:च्या कामगिरीच्या जोरावर युनायटेडला इंग्लिश प्रीमिअर लीगचे जेतेपद मिळवून दिले होते. पण या मोसमात त्याचा करिश्मा दिसलाच नाही. त्यामुळे युनायटेड संघ पराभवाच्या खाईत लोटत गेला.
फग्र्युसन यांच्यासोबत गेली २६ वर्षे काम करणारा मँचेस्टर युनायटेडचा साहाय्यकांचा (सपोर्ट स्टाफ) चमूही अनुभवी होता. पण मोयेस आल्यानंतर त्यांनी माइक फेलान, रेने मेउलेनस्टीन आणि इरिक स्टिले यांना डच्चू देत आपल्यासोबत एव्हरटन संघात काम करणाऱ्या स्टीव्ह राऊंड, फिल नेविले, जिमी लम्सडेन आणि ख्रिस वूड्स यांना संधी दिली. अनुभवी साहाय्यक संघातून बाहेर पडल्यानंतर युनायटेड संघ जसजसा पराभूत होत होता, तसतसे त्यांचे कच्चे दुवे समोर येत होते. ड्रेसिंग रूममध्येही मोयेस यांचे बडय़ा खेळाडूंशी खटके उडत होते. सराव शिबिरात कल्पकता आणि आक्रमकता यांचा समन्वय साधण्याऐवजी फक्त धावणे आणि बचावात्मक डावपेच अवलंबल्यामुळे मोयेस यांचे रॉबिन व्हॅन पर्सीशी वाजले होते. पदार्पणाच्या मोसमात चांगली कामगिरी करूनही विल्फ्रेड झाहाकडे मोयेस यांनी दुर्लक्ष केले. या मोसमात १० गोल करणाऱ्या डॅनी वेलबॅकला त्यांनी फारच मोजक्या सामन्यांमध्ये खेळवले. त्यामुळे वेलबॅकने युनायटेडला सोडचिठ्ठी देण्याचा विचारही केला होता. युनायटेडचा महान खेळाडू रायन गिग्जशी मोयेस यांचे छुपे युद्ध सुरू होते. गिग्ज याच्याशी ते अभावानेच संवाद साधत असत.
आधी बचाव.. नंतर आक्रमकपणा, हे मोयेस यांचे एव्हरटनचे प्रशिक्षक असतानाचे धोरण कमालीचे यशस्वी ठरले होते. पण युनायटेडसारख्या अव्वल क्लबसाठी त्यांची ही रणनीती पूर्णपणे फोल ठरली. इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये पहिल्यांदाच कमी गुण, २००१नंतर पहिल्यांदाच सलग तीन वेळा पराभूत, स्वानसीकडून घरच्या मैदानावर पहिला पराभव, १९७०नंतर पहिल्यांदाज एव्हरटनकडून दोन्ही लीग सामन्यांत पराभव, युनायटेडच्या इतिहासात पहिल्यांदाच पहिल्या मिनिटाला गोल पत्करणे, या सर्व गोष्टी मोयेस यांच्या एका वर्षांच्या कालावधीदरम्यानच घडल्या. चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत बायर्न म्युनिककडून पराभव, लीग चषकाच्या उपांत्य फेरीत संदरलँडसारख्या छोटय़ा संघाकडून पराभव, एफए चषकात तिसऱ्याच फेरीत स्वानसी सिटीकडून पराभूत होण्याची नामुष्की, एव्हरटनकडून पराभूत झाल्यामुळे १९९५-९६नंतर पहिल्यांदाच चॅम्पियन्स लीगसाठी पात्र न ठरणे या सुमार कामगिरीमुळे मोयेस यांची हकालपट्टी अटळ होती.
फुटबॉलचा मोसम जवळपास संपत आला आहे. प्रशिक्षकपदावरून डच्चू देण्यात आलेले डेव्हिड मोयेस हे पहिले बळी ठरले तरी दर्जेदार कामगिरी करू न शकणाऱ्या अनेक प्रशिक्षकांच्या हकालपट्टीच्या बातम्या आता येत राहतील. फुटबॉलमध्ये फक्त यश हवे असते, येथे अपयशाला थारा नसतो. म्हणूनच ‘येथे पाहिजे जातीचे’ याचा प्रत्यय वारंवार येतच राहणार!
संग्रहित लेख, दिनांक 27th Apr 2014 रोजी प्रकाशित
येथे पाहिजे जातीचे!
‘‘येथे पाहिजे जातीचे, येरा गबाळाचे काम नाही,’’ या तुकारामांच्या ओवी फुटबॉलमधील प्रशिक्षकांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतात.
First published on: 27-04-2014 at 01:26 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Football coach must be strong