मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) प्रशासनाची धुरा मनोहर जोशी यांनी अनेक वष्रे सांभाळली. त्यानंतर बऱ्याच वर्षांनंतर आमदार प्रताप सरनाईक आणि खासदार राहुल शेवाळे हे शिवसेनेचे नेते एमसीएच्या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सरनाईक यांच्याशी केलेली बातचीत-
शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार अशी चर्चा गेली काही वष्रे होत आहे..
एमसीएच्या घटनेनुसार ३४ वष्रे पूर्ण झालेली व्यक्तीच महत्त्वाच्या पदांसाठी लढू शकते. कार्यकारिणी सदस्यपदासाठी मात्र त्यांना उमेदवारी मिळू शकते. आदित्यबाबत गेल्या आणि यावेळीसुद्धा फक्त वावडय़ाच होत्या. अशा चर्चा होतच राहतात.
यंदा बऱ्याच वर्षांनी प्रथमच शिवसेनेचे नेते निवडणूक लढत आहेत. याबाबत काय म्हणाल?
आमचा खेळाशी आधी संबंध आला, मग राजकारणाशी. क्रीडापटूंना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. ठाणे-पालघर जिल्ह्णाापर्यंत एमसीएच्या योजना पोहोचतच नाहीत, याची खंत वाटते. या मंडळींचा बराचसा वेळ प्रवासात जातो. या पाश्र्वभूमीवर शिवसेनेनेही यंदा या रणांगणात उतरायचे ठरवले. तशात ‘क्रिकेट फर्स्ट’च्या माध्यमातून एमसीए निवडणुकीत निवडून आल्यावर मुंबई क्रिकेटला काय देणार आहोत, याची माहिती विजय पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि सुभाष देसाई यांना दिली. क्रिकेटच्या भल्यासाठी आणि मुंबईला क्रिकेटचे गतवैभव प्राप्त करून देण्याची त्यांची भावना आम्हाला महत्त्वाची वाटली.
‘क्रिकेट फर्स्ट’च्याच पाठीशी उभे राहण्याचा का निर्णय घेतला?
क्रिकेटचे संग्रहालय उभारणे, विविध वयोगटांसाठी मैदानांची निर्मिती आणि ठाणे-पालघरसारख्या भागातील क्रिकेटपटूंकरिता योजना पाटील यांनी आमच्यासमोर ठेवल्या. या पॅनेलमध्ये प्रवीण अमरे, लालचंद रजपूत, अ‍ॅबी कुरुविल्ला यांच्यासारखे क्रिकेटपटू तसेच मयांक खांडवाला, संजय पाटील, दीपक पाटील यांच्यासारखे प्रशासक आहेत. राजकारणापेक्षा मैदानाची अधिक सेवा करणारी मंडळी या गटात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजप आणि राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना आणि काँग्रेस असे राजकीय गणित या एमसीएच्या निवडणुकीच्या निमित्ताने मांडले जात आहे, याबाबत तुमचे काय मत आहे?
आशीष शेलार निवडणुकीला उभे राहिल्यानंतर त्यांनी आमच्यावर आरोप करायला सुरुवात केली आहे की, आम्ही काँग्रेससोबत आहोत. काही महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विजय पाटील यांचा भाऊ आमच्या पक्षाचा अधिकृत उमेदवार होता. त्यामुळे अशी बोंबाबोंब करणाऱ्यांनी वस्तुस्थिती नीट पाहावी. डी. वाय. पाटील स्टेडियम हे एका मराठी माणसाने उभे केले आहे. म्हणून त्याचे खच्चीकरण करायचे, हे योग्य नाही. प्रतिस्पर्धी गटाचे उमेदवार दिलीप वेंगसरकर यांना काही वर्षांपूर्वी शिवसेनेने पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिवसेनेवर चुकीचे आरोप करणे थांबवावे. केंद्रात-राज्यात एकत्रितपणे नांदणारी युती एमसीएच्या निवडणुकीतसुद्धा दिसावी अशी आमची अपेक्षा होती. उपाध्यक्षपदाच्या दोन जागांपैकी एका जागी शेलार यांनी लढावे, असा प्रस्ताव आम्ही त्यांच्यापुढे ठेवला होता.
शरद पवारांविरुद्धची लढत पाटील यांना किती आव्हानात्मक ठरेल?
अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पवार यांनी आशीर्वाद द्यावे, हीच इच्छा पाटील यांनी प्रकट केली आहे. वानखेडे स्टेडियमवरील सामन्यांपैकी काही सामने डी. वाय. पाटील स्टेडियमला देता आले असते. परंतु तसे घडले नाही. सहाराच्या स्टेडियमवर सामने होऊ शकतात, मग डी. वाय. पाटील स्टेडियमवर का नाही? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पाटील यांच्यावर अन्याय झाला आहे.
निवडणुकीला सामोरे जाताना मुंबईच्या क्रिकेटला काय द्यायचे ठरवले आहे?
जास्तीत जास्त क्रिकेटपटूंचा सहभाग वाढवणे, मुंबई क्रिकेट लीग सुरू करणे हे महत्त्वाचे आहे. याचप्रमाणे पालघर, नवी मुंबई, उल्हासनगर या भागांपर्यंत क्रिकेटचा विकास व्हायला हवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For the future of cricket shivsena is on the ground
First published on: 12-06-2015 at 03:34 IST