Cricketer Death News: ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू बॉब काउपर यांचे निधन झाले आहे. वयाच्या २८ व्या वर्षी ऑस्ट्रेलियन क्रिकेटला रामराम करणाऱ्या बॉब काउपर यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पोस्ट शेअर करून काउपर यांच्या निधनाची बातमी दिली. काउपर यांचे कर्करोगामुळे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पोस्ट शेअर करून लिहिले की, “आज क्रिकेट ऑस्ट्रेलिया बॉब काउपर यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहे. बॉबबद्दल बोलायचं झालं, तर ते डावखुऱ्या हाताचे उत्कृष्ट फलंदाज होते. त्यांनी ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये ५ शतकं झळकावली. ज्यात १९६६ मध्ये झालेल्या अॅशेल मालिकेतील त्रिशतकी खेळीचाही समावेश आहे. बॉब यांच्या कुटुंबीय, मित्र आणि सहकाऱ्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.” बॉब काउपर यांनी इंग्लंडविरूद्ध झालेल्या सामन्यात १२ तास फलंदाजी करून इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला होता. यासह ते ऑस्ट्रेलियात खेळताना त्रिशतकी खेळी करणारे पहिले फलंदाज ठरले होते.
कमी वयात क्रिकेटला रामराम
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या वयात एखाद्या खेळाडूची कारकिर्द सुरू होते, त्या वयात बॉब काउपर यांनी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. काउपर यांनी वयाच्या २८ व्या वर्षी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. १९७० मध्ये त्यांनी व्हिक्टोरीयाच्या शेफील्ड शिल्ड विजयानंतर, क्रिकेटकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.
काउपर यांना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १४७ सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्यांनी ५० च्या शानदार सरासरीने १०५९५ धावा चोपल्या. ज्यात २६ शतकं आणि ५८ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली. मात्र, त्यांना फार काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता आलं नाही.
काउपर यांच्या निधनानंतर क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे. अनेक दिग्गज खेळाडूंनी त्यांच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहिली आहे. काउपर हे गेल्या ६ महिन्यांत जगाचा निरोप घेणारे १९७० च्या दशकातील तिसरे क्रिकेटपटू आहेत. गेल्या ६ महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या ३ दिग्गज खेळाडूंचे निधन झाले आहे. गेल्या वर्षी इयान रेडपाथ यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले होते. तर किश स्टेकपॉल यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले होते.