वयाचे शतक साजरे करणारे देशातील तिसरे क्रिकेटपटू रघुनाथ ऊर्फ बापू चांदोरकर यांचे शुक्रवारी दुपारी वृद्धापकाळाने अंबरनाथ येथील कमलधाम वृद्धाश्रमात निधन झाले. ते १०१ वर्षांंचे होते.

मधल्या फळीतील फलंदाज आणि यष्टीरक्षण हे वैशिष्टय़ असणाऱ्या चांदोरकर यांनी १९४३-४४ ते १९४६-४७ या कालखंडात महाराष्ट्राचे आणि १९५०-५१ वर्षांत बॉम्बेचे (मुंबई) सात प्रथमश्रेणी सामन्यांत प्रतिनिधित्व केले आणि एकूण १५५ धावा केल्या. ३७ ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती. याशिवाय तीन झेल आणि दोन यष्टीचीत त्यांच्या खात्यावर आहेत.

प्रा. दिनकर बळवंत देवधर (१८९२-१९९३) आणि वसंत रायजी (१९२०-२०२०) यांच्यानंतर शंभर वष्रे जगणारे चांदोरकर हे तिसरे क्रिकेटपटू होते. त्यांचे प्रदीर्घ काळ डोंबिवलीत वास्तव्य होते. शंभरी ओलांडलेले एकमेव हयात असलेले क्रिकेटपटू म्हणून त्यांचा ‘एमसीए’ने गेल्या वर्षी खास सत्कार केला होता व त्यांना पेन्शन घोषित केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चांदोरकर यांचा मुलगा विजय व पत्नीचे बऱ्याच वर्षांपूर्वी तर कन्या डॉ. भाग्यश्री हर्डीकर यांचे काही वर्षांंपूर्वी निधन झाले. त्यांची दुसरी कन्या डॉ. जयश्री अमेरिकेत असते. सनदी अधिकारी श्रावण हर्डीकर हे त्यांचे नातू आहेत.

वयाच्या सत्तरीत चांदोरकर खेळाडूंना मार्गदर्शनासाठी मैदान गाठायचे. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि अंबरनाथ या पट्टय़ात त्यांच्याविषयी प्रचंड आदर होता. ऐंशीव्या वर्षीही ते चार किलोमीटरचे अंतर सायकलने पार करायचे. तंदुरुस्ती, आहार याकडे ते गांभीर्याने पाहायचे.