Ambati Rayudu On Vaibhav Suryavanshi: भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून पाहिल्या जाणाऱ्या वैभव सूर्यवंशीला वयाच्या १४ व्या वर्षी आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. पहिल्याच हंगामात त्याने दमदार कामगिरी केली. वैभव आयपीएल स्पर्धेत फलंदाजी करताना सर्वात कमी वयात शतक झळकावण्याचा विक्रम आपल्या नावे नोंदवला. वैभवने ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाविरूद्ध खेळताना दमदार कामगिरी केली होती. या कामगिरीची दखल घेऊन त्याची आयपीएल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती.

यासह त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये बिहारकडून रणजी ट्रॉफी, सैय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफी खेळण्याची संधी देखील मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी इंग्लंडविरूद्ध झालेल्या युथ वनडे आणि कसोटी मालिकेत त्याने धावांचा पाऊस पाडला होता. यासह युथ वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर नोंदवला होता. काहींनी तर त्याला भारतीय संघात स्थान देण्याची मागणी केली आहे. दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडूने त्याची तुलना दिग्गज खेळाडू ब्रायन लारांसोबत केली आहे.

काय म्हणाला अंबाती रायुडू?

वैभव सूर्यवंशी आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो.डावखुऱ्या हाताने फलंदाजी करणाऱ्या वैभवने आंतरराष्ट्रीय गोलंदाजांचीही चांगलीच धुलाई केली होती. अंबाती रायुडूच्या मते, वैभव सूर्यवंशीची फटका मारण्याची स्टाईल ही ब्रायन लारा सारखीच आहे. तो लांरासोबत चर्चा करून आपल्या फलंदाजीत आणखी सुधारणा करू शकतो.

तसेच तो पुढे म्हणाला, “जेव्हा तो डिफेन्स करतो किंवा चेंडू हलक्या हाताने खेळून काढतो, तेव्हा फलंदाजीत नियंत्रण कसं ठेवावं हे जर त्याने शिकून घेतलं तर तो आणखी चांगला फलंदाज बनू शकतो. मग, त्याला कोणीच थांबवू शकणार नाही. फक्त त्याला एकच गोष्ट करावी लागेल, लोकांचे सल्ले ऐकणं बंद करावं लागेल. जर त्याला योग्य मार्गदर्शन मिळालं, तर तो आणखी पुढे जाऊ शकतो. तो नशिबवान आहे की,त्याला राहुल द्रविडसारखा प्रशिक्षक लाभला आहे.”

वैभवने आयपीएल २०२५ स्पर्धेत राजस्थान रॉयल्सकडून खेळताना ७ सामन्यांमध्ये २५२ धावा केल्या. यादरम्यान त्याने १ शतक आणि १ अर्धशतक झळकावलं. यादरम्यान १०१ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली.