Ganesh Doda On Lucknow Super Giants: भारताचा स्टार फलंदाज केएल राहुल गेल्या हंगामापर्यंत लखनऊ सुपरजायंट्स संघाचं प्रतिनिधित्व करत होता. मात्र, आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दिल्लीने १४ कोटी रूपये मोजून त्याला आपल्या संघात स्थान दिलं. यादरम्यान केएल राहुल आणि संघमालक संजीव गोयंका यांच्यातील वाद चांगलाच रंगला होता. काही दिवसांपूर्वी भारतीय संघाने इंग्लंडमध्ये दमदार कामगिरी केली. या कामगिरीचं कौतुक करण्यासाठी लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून भारतीय खेळाडूंचं कौतुक करणारे पोस्ट शेअर करण्यात आले होते. पण या पोस्टमध्ये केएल राहुल कुठेच दिसून आला नाही. त्यामुळे भारताचे माजी खेळाडू डोडा गणेश यांनी संताप व्यक्त केला आहे.

शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यावर दमदार कामगिरी केली. ही मालिका २-२ ने बरोबरीत राहिली. या संघाचं कौतुक करण्यासाठी लखनऊ सुपर जायंट्स संघाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ८ ऑगस्टला एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये भारतीय संघातील खेळाडूंचे फोटो कोलाज करण्यात आले होते. ज्यावर कॅप्शन म्हणून,”पिढ्यान्‌पिढ्यांसाठी जपून ठेवावा असा फोटो अल्बम..” असं लिहिण्यात आलं आहे. या पोस्टवरून गणेश डोडा यांनी संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाले गणेश डोडा?

गणेशे डोडा यांनी लखनऊ सुपर जायंट्स संघाची पोस्ट रिपोस्ट करत लिहिले की, “हे लाजिरवाणे आहे. तुम्हाला अशा सलामीवीराचा फोटो मिळाला नाही, ज्याने नवीन चेंडू खेळून काढला आणि ५०० पेक्षा अधिक धावा केल्या!” या फोटोमध्ये कर्णधार शुबमन गिल, उपकर्णधार ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, आकाशदीप आणि मोहम्मद सिराज यांचा देखील समावेश आहे. आकाशदीप आणि ऋषभ पंत हे दोघेही आयपीएल स्पर्धेत लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून खेळतात. त्यामुळे या दोघांचे अनेक फोटो आहेत.

केएल राहुलने या संघाची साथ सोडून दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कदाचित लखनऊ सुपर जायंट्सने त्याचा फोटो या कोलाजमध्ये मुद्दाम टाकला नसावा अशा चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. डोडा गणेश यांनी याआधी देखील केएल राहुलसाठी पोस्ट शेअर केली आहे. केएल राहुलचं भारतीय टी-२० संघात पुनरागमन झाल्यानंतर, डोडा यांनी केएल राहुलसाठी पोस्ट शेअर केली होती. केएल राहुल इंग्लंड दौऱ्यावर चमकला. त्याने डावाची सुरूवात करताना या दौऱ्यावर २ शतकं झळकावली. ५ सामन्यांमध्ये त्याने ५३.२० च्या सरासरीने ५३२ धावा केल्या.