वृत्तसंस्था, इंदूर
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील निर्णायक सामन्यात ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत यष्टिरक्षक-फलंदाजाची भूमिका बजावलेल्या ध्रुव जुरेलला आगामी दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी मध्य विभागाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली आहे. तसेच रणजी विजेत्या विदर्भाच्या संघातील हर्ष दुबे, यश राठोड, दानिश मालेवार आणि आदित्य ठाकरे या चार खेळाडूंचा मध्य विभागाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. दुलीप करंडक स्पर्धेला २८ ऑगस्टपासून प्रारंभ होणार असून नव्या देशांतर्गत क्रिकेट हंगामाची ही सुरुवात ठरेल.
रणजीच्या गतहंगामात डावखुरा फिरकीपटू हर्ष दुबेने इतिहास घडवला होता. त्याने रणजीच्या एका हंगामात सर्वाधिक ६९ बळी मिळविण्याचा विक्रम रचला होता. त्यामुळे त्याची भारत ‘अ’ संघातही निवड झाली होती. विदर्भाच्या जेतेपदात यश राठोड आणि दानिश मालेवार या फलंदाजांनी, तसेच वेगवान गोलंदाज आदित्य ठाकरेनेही महत्त्वाची भूमिका बजावली होती. डावखुऱ्या राठोडने सर्वाधिक ९६० धावा केल्या होत्या. तर केरळविरुद्धच्या अंतिम लढतीत मालेवारने १५३ आणि ७३ धावांची खेळी केली होती. उंचपुऱ्या ठाकरेने आठ सामन्यांत २८ गडी बाद केले होते. त्यामुळे या चौघांना आता दुलीप करंडकात संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, विदर्भाचेच उस्मान घनी मध्य विभागाचे प्रशिक्षकपद भूषवतील. विदर्भाचा वेगवान गोलंदाज यश ठाकूर राखीव खेळाडूंमध्ये असेल.
चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवलाही या संघात स्थान देण्यात आले आहे. कुलदीप इंग्लंड दौऱ्यासाठी कसोटी संघाला भाग होता, पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे भारतातील आंतरराष्ट्रीय हंगामापूर्वी त्याचा लय मिळविण्याचा प्रयत्न असेल.
संघ : ध्रुव जुरेल (कर्णधार), रजत पाटीदार (उपकर्णधार), आर्यन जुयल (यष्टिरक्षक), आयुष पांडे, यश राठोड, दानिश मालेवार, शुभम शर्मा, संजीत देसाई, कुलदीप यादव, हर्ष दुबे, मानव सुथार, आदित्य ठाकरे, दीपक चहर, खलील अहमद, सरांश जैन.
राखीव खेळाडू : महिपाल लोमरोर, यश ठाकूर, माधव कौशिक, कुलदीप सेन, युवराज चौधरी, उपेंद्र यादव.