सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या ‘इंडिया ३० अंडर ३०’ या फोर्ब्सच्या यादीत जसप्रीत बुमराह, हरमनप्रीत कौर, सविता पुनिया आणि हीना सिद्धू या खेळाडूंची वर्णी लागली आहे. त्यामुळे या चारही खेळाडूंच्या युवागिरीने सर्वांचीच मनं जिंकली असेच म्हणावे लागेल. या यादीत निवड निवड करतेवेळी काही निकषांवर खेळाडूंची पारख करण्यात येते. इतरांवर प्रभाव पाडण्याची आणि अडचणींवर मात करण्याची क्षमता, प्रदीर्घ काळासाठी खेळात सक्रिय राहण्यासाठीची त्यांची पात्रता या गोष्टींवर निवड प्रक्रियेदरम्यान भर दिला जातो. निवड प्रक्रियेमध्ये या निकषांच्या बळावर पात्र ठरणाऱ्या खेळाडूंचीच फोर्ब्सच्या यादीत वर्णी लागते. ज्यामध्ये यंदाच्या वर्षी या युवा खेळाडूंनी बाजी मारली आहे.

जसप्रीत बुमराह-
कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेतून पदार्पण करणारा जसप्रीत बुमराह त्याच्या जलदगती गोलंदाजीमुळे प्रसिद्धीझोतात आला. गेल्या वर्षी २३ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ३९ विकेट्स घेतले. गेल्या काही वर्षांमध्ये जसप्रीतने मर्यादीत षटकांच्या क्रिकेट सामन्यांमध्ये आपल्या गोलंदाजीने एक वेगळीच ओळख प्रस्थापित केली आहे.

हरमनप्रीत कौर-
महिला क्रिकेट विश्वकप शृंखलेमध्ये उपांत्य सामन्यात १७१ धावांची धमाकेदार खेळी खेळणारी पंजाबी कुडी म्हणजे हरमनप्रीत कौर. इंग्लंडच्या संघाविरोधात भारतीय संघाची ही खेळी सर्वाधिक पाहिली गेलेली खेळी ठरली आहे. अर्जुन पुरस्कार विजेती हरमनप्रीत कौर फक्त क्रिकेट विश्वातच नव्हे तर संपूर्ण क्रिडा विश्वात तिने स्वत:चा दबदबा निर्माण केला.

हीना सिद्धू-
गेल्या वर्षी नेमबाजी करतेवेळी बोटाला दुखापत झालेली असतानाही हीनाने मोठ्या जिद्दीने त्यावर मात केली. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ब्रिस्बेनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कॉमनवेल्थ शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये तिने सुवर्णपदकाची कमाई केली होती. अर्जुन पुरस्काराना गौरविण्यात आलेली ही खेळाडू तिच्या ठाम भूमिकांसाठीसुद्धा ओळखली जाते. २०१४ आणि २०१६ मध्ये तेहरनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एशिअयन गन चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यास तिने स्पष्ट नकार दिला होता. महिला स्पर्धकांवर इराणकडून हिजाब घालण्याची सक्ती करण्यात आल्यामुळे तिने हे पाऊल उचलले होते.

सविता पुनिया-
भारतीय महिला हॉकी संघात आपल्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधणारी खेळाडू म्हणजे सविता पुनिया. तरबेज आणि चपळ गोलकिपिंगसाठी ओळखली जाणारी सविता अनेकदा भारतीय महिला हॉकी संघाच्या विजयासाठी कारणीभूत ठरली असून आपल्या कामगिरीमुळे नेहमीच चमकली आहे.

पॅरालिम्पिकमधल्या पहिल्या सुवर्णपदक विजेत्याचा गौरव, जाणून घ्या कोण आहेत मुरलीकांत पेटकर?