फ्रेंच ओपन सुपरसिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपला बोलबाला कायम ठेवला आहे. उपांत्य सामन्यात भारताचा किदम्बी श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय हे खेळाडू आमने सामने येणार आहेत. या दोनही खेळाडूंनी शुक्रवारी रात्री आपापले उपांत्यपुर्व फेरीचे सामने जिंकत उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं. त्यामुळे आता अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

या हंगामात किदम्बी श्रीकांतची कामगिरी ही बहरलेली आहे. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि डेन्मार्क या सुपरसिरीज बॅडमिंटन स्पर्धेची श्रीकांतने विजेतेपद पटकावली आहेत. याचसोबत सिंगापूर ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीतही श्रीकांतने धडक मारली होती. त्यामुळे प्रणॉयवर विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारल्यास एका वर्षात पाचव्या सुपर सिरीज स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणारा श्रीकांत हा एकमेव भारतीय खेळाडू ठरणार आहे.

दुसरीकडे एच.एस.प्रणॉयसाठी यंदाचा हंगाम हा तितकासा चांगला राहिलेला नाही. मात्र प्रणॉयने अनेक तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांना पराभवाचा धक्का दिला आहे. ऑलिम्पिक पदकविजेत्या ली चाँग वी आणि चेन लाँग यासारख्या खेळाडूंना प्रणॉयने पराभूत केलं आहे. याचसोबत प्रणॉय आणि श्रीकांत हे दोन्ही खेळाडू पुलेला गोपीचंद अकादमीत एकत्र सराव करतात, यामुळे एकमेकांचा कच्चे दुवे या खेळाडूंना माहिती आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये होणारा उपांत्य सामना हा चांगलाच रंगतदार होईल अशी अपेक्षा वर्तवण्यात येतेय.

फ्रेंच ओपन स्पर्धेत श्रीकांतला सलामीला फारसा प्रतिकार सहन करावा लागला नाही. आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर सहज मात करत श्रीकांतने पुढच्या फेरीसाठी आगेकूच केली. मात्र उपांत्यपुर्व फेरीत श्रीकांतला चांगलीच कडवी टक्कर मिळाली. मात्र पिछाडी भरुन काढत श्रीकांतने ८-२१, २१-१९, २१-९ असा रोमहर्षक विजय मिळवला. दुसरीकडे प्रणॉयनेही या स्पर्धेत ली ह्यून, ख्रिस्टन विटींगुश, जीओन ह्योंक जीन यासारख्या खेळाडूंना घरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत जो खेळाडू सामना जिंकेल तो या स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्यासाठी फेव्हिरीट मानला जातोय. जपानच्या केंटा निशीमोटो आणि डेन्मार्कच्या अँडर्स अँटोसेन यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.