सायना, सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

पॅरिस : सात्त्विकसाईराज रनकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारताच्या पुरुष दुहेरीतील जोडीने विश्वविजेत्या मोहम्मद एहसान आणि हेंद्रा सेटियावान जोडीला पराभवाचा धक्का दिला. सात्त्विक-चिराग यांच्यासह महिला एकेरीत पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची गुरुवारी उपांत्यपूर्व फेरी गाठली.

ऑगस्ट महिन्यात थायलंड खुल्या स्पर्धेच्या जेतेपदाच्या निमित्ताने पहिलीवहिली ‘सुपर ५००’ दर्जाची स्पर्धा जिंकणाऱ्या सात्त्विक-चिराग जोडीने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरील मोहम्मद-हेंद्रा जोडीला २१-१८, १८-२१, २१-१३ असे नमवले. मोहम्मद-हेंद्रा जोडीने २०१३, २०१५ आणि २०१९मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आहे. सात्त्विक-चिराग जोडीला उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानावरील डेन्मार्कच्या किम अ‍ॅस्ट्रप आणि स्कारूप रासमुसीन जोडीशी सामना करायचा आहे.

विश्वविजेतेपदानंतर चीन, कोरिया आणि डेन्मार्क अशा तीन स्पर्धामध्ये सुरुवातीच्या फेऱ्यांमध्येच गाशा गुंडाळणाऱ्या सिंधूने सिंगापूरच्या येऊ जिया मिनला ३४ मिनिटांत २१-१०, २१-१३ असे पराभूत केले. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावरील सिंधूची पुढील फेरीत क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या चायनीज तैपेईच्या ताय झू यिंगशी सामना होणार आहे.

लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवणाऱ्या आठव्या मानांकित सायनाने डेन्मार्कच्या लिने होजमार्क कार्सफिल्डचा २७ मिनिटांच्या लढतीत २१-१०, २१-११ असा पाडाव केला.