‘मातीच्या कोर्टवरील बादशाह’ राफेल नदाल व अमेरिकेची अनुभवी खेळाडू सेरेना विल्यम्स यांना फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेसाठी अनुक्रमे पुरुष व महिला गटात अग्रमानांकन मिळाले आहे. या स्पर्धेला रविवारपासून रोलँड गॅरोस येथे प्रारंभ होत आहे.
नदालला पहिल्या फेरीत अमेरिकेच्या रॉबी गिनेपीचे आव्हान असणार आहे, तर द्वितीय मानांकित नोव्हाक जोकोविचची सलामीला पोर्तुगालच्या जोओ सोसा याच्याशी लढत होणार आहे. स्टानिस्लास वॉवरिन्क या स्वित्र्झलडच्या खेळाडूस तिसरे मानांकन मिळाले असून त्याची गुलिर्मो गार्सिया याच्याशी गाठ पडणार आहे. रॉजर फेडरर याला विक्रमी ग्रँड स्लॅम विजेतेपदाच्या प्रतीक्षेत असून त्याच्यापुढे लुकास लॅको याचे आव्हान आहे.
महिलांमध्ये सेरेना या अग्रमानांकित खेळाडूला स्थानिक खेळाडू अ‍ॅलिसा लिम हिच्याशी खेळावे लागणार आहे. चीनची खेळाडू ली ना हिला द्वितीय मानांकन मिळाले असून तिला ख्रिस्तिना मिन्लादेनोस्ट्रीक हिच्याशी खेळावे लागेल. अ‍ॅग्नीझेका राडवानस्का हिला चौथे मानांकन देण्यात आले आहे तर माजी विजेती मारिया शारापोवा हिला सातवे मानांकन मिळाले आहे.