Costliest Things In Cricket: क्रिकेट हा खेळ सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. क्रिकेट या खेळाचा चाहतावर्ग जगभर पसरलेला आहे. क्रिकेटपटूंनी वापरलेल्या वस्तू देखील चाहत्यांना आकर्षित करतात. त्यामुळे जेव्हा एखादी वस्तू लिलावात बोली लावण्यासाठी ठेवली जाते, त्यावेळी क्रिकेट चाहते आपल्या आवडत्या खेळाडूची वस्तू खरेदी करण्यासाठी पैशांचा पाऊस पाडतात. ज्यात धोनीच्या बॅटपासून ते डॉन ब्रॅडमन यांच्या कॅपचा देखील समावेश आहे.

जगभरात बोली लागलेल्या सर्वात महागड्या क्रिकेट वस्तू

शेन वॉर्नची बॅगी ग्रीन कॅप:

ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन वॉर्नने २०२० मध्ये आपली कॅप लिलावात ठेवली होती. २०२० मध्ये ऑस्ट्रेलियातील जंगलात मोठ्या प्रमाणात आग लागली होती. या आगीत झालेल्या नुकसानीची भरपाई करून काढण्यासाठी त्याने निधी गोळा करण्यासाठी ही कॅप लिलावात ठेवली होती. या कॅपवर विक्रमी १००९५०० ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच ५.७९ कोटींची बोली लागली होती. कॉमनवेल्थ बँक ऑफ ऑस्ट्रेलियाने ही विक्रमी बोली लावली होती. ही कॅप ब्रॅडमन म्युझियम, ब्रोवल येथे ठेवण्यात आली आहे.

सर डॉन ब्रॅडमन यांची कसोटी पदार्पणाची कॅप (१९२८):

ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज डॉन ब्रॅडमन यांनी १९२८ मध्ये इंग्लंडविरूद्ध खेळताना कसोटी पदार्पण केलं होतं. त्यावेळी त्यांना मिळालेली कॅप ही २०२० मध्ये लिलावात ठेवण्यात आली होती. या कॅपवर ४५०,००० ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच २.५९ कोटी रूपये इतकी बोली लागली होती.

डॉन ब्रॅडमन यांची बॅगी कॅप (१९४६-४७ अॅशेस मालिका)

सर डॉन ब्रॅडमन यांनी १९४६-४७ मध्ये झालेल्या मालिकेत दमदार कामगिरी केली होती. या मालिकेत त्याने ९७.१४ च्या सरासरीने फलंदाजी करताना ६८० धावा केल्या होत्या. या मालिकेत डॉन ब्रॅडमन यांनी जी बॅगी ग्रीन कॅप परिधान केली होती. त्या कॅपवर ४३८५०० ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच २.५२ कोटी रूपये बोली लागली होती. ही कॅप नॅशनल म्युझियम ऑफ ऑस्ट्रेलियामध्ये संग्रहित करण्यात आली आहे.

डॉन ब्रॅडमन यांनी शेवटच्या दौऱ्यात परिधान केलेली कॅप (१९४८)

हा तोच दौरा आहे, ज्या दौऱ्यावर डॉन ब्रॅडमन यांना १०० ची विक्रमी सरासरी गाठण्याची संधी होती. त्यांना हा विक्रम करण्यासाठी आपल्या शेवटच्या डावात अवघ्या ४ धावांची गरज होती. पण या डावात ते शून्यावर माघारी परतले होते. या कॅपवर २००३ मध्ये झालेल्या लिलावात १७०,००० युरो म्हणजेच २.२ कोटींची बोली लागली होती.

एमएस धोनीची बॅट (२०११)

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने मुंबईतील वानखेडे स्टेडियमव भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. श्रीलंकेविरूद्ध झालेल्या वर्ल्डकप २०११ स्पर्धेतील अंतिम सामन्यात धोनीने षटकार मारून भारताला २८ वर्षांनंतर वर्ल्डकप जिंकून दिला होता. धोनीने ज्या बॅटने षटकार मारला होता, त्या बॅटवर विक्रमी १०००० युरो म्हणजे १.१९ कोटी रूपये इतकी बोली लागली होती. आर.के. ग्लोबल सेक्युरिटीज लिमिटेडने ही बॅट खरेदी केली होती. यासह धोनीची बॅट सर्वात महागडी बॅट ठरली होती.