Asia Cup 2025 Gautam Gambhir Video: भारताने आशिया चषकातील सुपर फोर सामन्यातही पाकिस्तानचा दारूण पराभव केला. पण या सामन्यातही पाकिस्तानच्या खेळाडूंशी हात न मिळवण्याचा भारतीय संघाचा पवित्रा कायम होता. नाणेफेकीवेळी सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हस्तांदोलनही केलं नाही, इतकंच काय तर त्याच्याकडे पाहिलंसुद्धा नाही. तर सामन्यादरम्यान भारताचे फलंदाज आणि पाकिस्तानच्या गोलंदाजांमध्ये वादावादी होतानाही पाहायला मिळालं. यानंतर गौतम गंभीरचा सामन्यानंतरचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.

भारताने पाकिस्तानचा ६ गडी राखून पराभव केला. पाकिस्तानने सलामीवीर फरहानच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना १७१ धावा केल्या. तर प्रत्युत्तरात भारताने गिल आणि अभिषेकच्या १०५ धावांच्या भागीदारीच्या बळावर १८.५ षटकांत सहज विजय मिळवला. भारताने विजय मिळवल्यानंतर तिलक आणि हार्दिक थेट मैदानाबाहेर निघून गेले.

गट टप्प्यातील सामन्यात भारतीय संघाने विजयानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नाही. भारतीय संघाने विजय मिळवल्यानंतर थेट ड्रेसिंग रूममध्ये गेले आणि दरवाजा लावून घेतला. यानंतर हँडशेक वादावरून मोठा गदारोळ झाला होता. पण त्यानंतरही सुपर फोर सामन्यात हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला.

सुपर फोरमधील सामन्यानंतरही भारताचे खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये होते. तितक्यात प्रशिक्षक गंभीरने त्याच्या खेळाडूंना फक्त पंचांशी हस्तांदोलन करण्याचे निर्देश दिले. सामना संपल्यानंतरही तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या थेट ड्रेसिंग रूममध्ये गेले आणि त्यांनी पाकिस्तानी खेळाडू किंवा पंचांशीदेखील हस्तांदोलन केलं नाही.

गंभीरने भारताच्या खेळाडूंना विजयानंतर मैदानावर येण्यास सांगितलं

भारताच्या खेळाडूंनी एकमेकांना हस्तांदोलन केलं आणि प्रेंझेटेशन सेरेमनीसाठी थांबले होते. तितक्यात संघाचे कोच गौतम गंभीर कोचिंग स्टाफसह डगआऊटजवळ होते. त्याने तितक्यात सर्व खेळाडूंना बोलवालं आणि सांगितलं, “पंचांशी तर हस्तांदोलन करायला या.” भारतीय संघ पंचांशी हस्तांदोलन करण्यासाठी उतरल्याचं पाहून पाकिस्तान संघही चकित होऊन पाहित राहिला.

गौतम गंभीरने सांगितल्यानंतर सर्व खेळाडू मैदानावर उतरले आणि पंचांशी हस्तांदोलन केलं. गौतम गंभीरचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते या व्हीडिओवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

भारतीय संघाने पाकिस्तानवर विजय मिळवत सुपर फोर टप्प्यातील गुणतालिकेत २ गुण आणि कमालीच्या नेट रन रेटसह पहिलं स्थान मिळवलं आहे. तर दुसऱ्या स्थानी बांगलादेशचा संघ आहे. भारतीय संघाला आता सुपर फोरमध्ये श्रीलंका आणि बांगलादेश यांच्याविरूद्ध सामने खेळायचे आहेत.