IND vs ENG 5th Test Shubman Gill Gautam Gambhir: ओव्हलच्या मैदानावर झालेल्या अखेरच्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर अवघ्या ६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. अखेरच्या दिवशी मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने यजमान संघाला अवघ्या ३५ धावाही करू दिल्या नाहीत. पण या विजयादरम्यान कोच गौतम गंभीर आणि शुबमन गिल यांनी मॅच रेफरीने दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत संघाच्या विजयावर कसा जोर दिला; याचा एक रंजक किस्सा समोर आला आहे.

ओव्हल कसोटीचा निकाल सामन्याची स्थिती पाहता चौथ्या दिवशीच लागणार असं चित्र स्पष्ट दिसत होतं. पण चौथ्या दिवशी अखेरच्या सत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आणि मैदानाचा भाग ओला असल्यामुळे त्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. यानंतर पाचव्या दिवशी सामना करो या मरो स्थितीत होता.

ओव्हल कसोटीच्या अखेरच्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी काय घडलं?

भारताला विजयासाठी ४ विकेट्सची गरज होती, तर इंग्लंडला विजय मिळवण्यासाठी ३५ धावा करायच्या होत्या. मैदानावर मोठं तणावाचं वातावरण होतं, पण तरीही भारताच्या गोलंदाजांनी आणि संपूर्ण संघाने दणदणीत विजय मिळवलाच. पण या विजयादरम्यान मैदानावर जितकी तणावाची स्थिती होती, तितकीच मैदानाबाहेर देखील होती.

सामनाधिकाऱ्यांनी भारतीय संघ आणि कोचला काय इशारा दिला होता?

दैनिक जागरणमधील रिपोर्टनुसार, सामनाधिकारी जेफ क्रो यांनी भारतीय संघाला स्पष्ट सांगितलं की शेवटच्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी ते आवश्यक गतीपेक्षा सहा षटकं मागे आहेत आणि याचे परिणामही गंभीर परिणाम होचे. जर भारत इंग्लंडला सर्वबाद करण्यात आणि ओव्हर रेटची तूट भरून काढण्यात अपयशी ठरला, तर त्यांचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) गुणतालिकेत चार महत्त्वाचे कापले जाणार होते.

नवीन WTC चक्रातील इंग्लंडविरूद्ध भारताची पहिली मालिका होती आणि गेल्या वर्षीच्या अंतिम सामन्यात खेळू न शकल्याने, प्रत्येक गुण हा यंदा महत्त्वाचा आहे. ड्रेसिंग रूममध्ये यासंदर्भात रणनीती बैठक सुरू झाली. गिल, गंभीर, सहाय्यक प्रशिक्षक सितांशू कोटक आणि इतरांनी रणनीतीबाबत चर्चा सुरू केली.

अहवालात असं म्हटलं आहे की, ओव्हर रेट सुधारण्यासाठी दोन्ही फिरकीपटू, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना सुरूवातीला खेळवण्याचा सल्ला देण्यात आला. परंतु सामन्याची स्थिती पाहता हा मोठा धोका होता, कारण इंग्लंडचे जेमी स्मिथ आणि जेमी ओव्हरटन हे मैदानावर सेट झाले होते आणि वेगाने लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी प्रयत्न करत होते.

“मला ओव्हर रेटची काही पर्वा नाही, चार गुण गेले तर जाऊ दे. आपण जिंकण्यासाठीच खेळत आहोत,” असं कोच गौतम गंभीर म्हणाल्याचं रिपोर्टमध्ये नमूद केलं आहे. गिलने प्रशिक्षकांच्या मताशी सहमती दर्शवली आणि निर्णय झाला. वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांनी ओव्हररेट पेनल्टीची पर्वा न करता दोन्ही बाजूंनी आक्रमण करण्याचं ठरलं.

सिराज आणि प्रसिधला गोलंदाजी देणं हा निर्णय अगदी भारताच्या पथ्यावर पडला. सुरूवातीला सिराजने जेमी स्मिथला बाद केलं. यानंतर जेमी सिराजने जेमी ओव्हरटनला माघारी धाडलं. यानंतर प्रसिध कृष्णाने जोश टंगला क्लीन बोल्ड केलं अन् ६ धावांची गरज असताना अखेरीस सिराजने एटकिन्सनला बोल्ड करत भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला.