Gautam Gambhir Slammed For Shreyas Iyer Asia Cup Snub: आशिया चषक २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात श्रेयस अय्यरला न घेतल्याबद्दल सध्या गदारोळ सुरू आहे. माजी क्रिकेटपटू, चाहते आणि क्रिकेट समीक्षकांपासून सर्वांकडूनच भारतीय संघ व्यवस्थापन, निवड समिती आणि कोचवर टीका केली जात आहे. दरम्यान भारताच्या माजी खेळाडूने गौतम गंभीरवर आरोप केला आहे.

गौतम गंभीरवर टीम इंडियामध्ये पक्षपातीपणा दाखवल्याचा आरोप होत आहे. श्रेयस अय्यरने अलिकडच्या स्पर्धांमध्ये प्रभावी कामगिरी केली असूनही, आशिया कप संघात त्याचा समावेश करण्यास मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने पाठिंबा दिला नाही, असा आरोप माजी भारतीय खेळाडूने केला आहे.

आगामी आशिया चषक २०२५ साठी भारताच्या टी-२० संघात श्रेयस अय्यरला स्थान मिळेल अशी आशा होती, परंतु त्याची निवड झाली नाही. श्रेयस अय्यरने या वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारी आणि मार्चमध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ५ सामन्यांमध्ये ४८.६० च्या सरासरीने २४३ धावा केल्या. यादरम्यान श्रेयस अय्यरने २ अर्धशतकं झळकावली आहेत. भारताला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात श्रेयस अय्यरने मोठी भूमिका बजावली. श्रेयस अय्यरने अलिकडेच १७ आयपीएल सामन्यांमध्ये ५०.३३ च्या सरासरीने ६०४ धावा केल्या.

हेही वाचा

श्रेयस अय्यरला आशिया चषक संघात संधी न दिल्याने गंभीरवर माजी खेळाडूचे मोठे आरोप

भारताचे माजी क्रिकेटपटू सदागोपन रमेश गौतम गंभीरवर आरोप करताना म्हणाले, “तो (गौतम गंभीर) त्याला आवडणाऱ्या खेळाडूंना पाठिंबा देतो, पण त्याला नावडत्या खेळाडूंना पूर्णपणे वगळतो. कोहली आणि शास्त्री यांच्या कारकिर्दीत विदेशात सातत्याने विजय मिळवणं खूप पूर्वीपासून सुरू झाले होतं. पण आता, इंग्लंडमधील अनिर्णित मालिका गंभीरच्या ट्रॅक रेकॉर्डमधील एक मोठी कामगिरी म्हणून सादर केली जात आहे.”

माजी भारतीय क्रिकेटपटू पुढे म्हणाले, “गौतम गंभीरची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणं आणि त्या यशाचं सर्वात मोठं कारण श्रेयस अय्यर होता. तरीही, गौतम गंभीर त्याला पाठिंबा देत नाहीये. जैस्वालसारखा खेळाडू, जो एक्स-फॅक्टर खेळाडू आहे, त्याने सर्व फॉरमॅटमध्ये खेळायला हवं. त्याला स्टँडबायवर ठेवणं चुकीचं आहे.सदागोपन रमेश यांनी अय्यरच्या फॉर्म आणि आत्मविश्वासामुळे तो भारताच्या व्हाईट-बॉल संघासाठी चॅम्पियन बनला आहे यावर भर दिला.”

अय्यरच्या फॉर्मबद्दल बोलताना रमेश म्हणाले, “चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रेयस अय्यरने अविश्वसनीय कामगिरी केली आणि त्याला भारताच्या वनडे संघात सहभागी केलं पाहिजे. खेळाडू फॉर्ममध्ये असताना त्यांना पाठिंबा द्यायला हवा, ते कमी पडत असताना नाही. अय्यरच्या गगनाला भिडणाऱ्या आत्मविश्वासाचा फायदा घेण्याची हीच योग्य वेळ आहे.”

भारताचा आशिया चषक २०२५ साठी संपूर्ण संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षित सिंह राणा, रिंकू सिंह