वृत्तसंस्था, दुबई

माजी सलामीवीर गौतम गंभीरने प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळल्यापासून भारतीय संघाला कसोटी क्रिकेटमध्ये फारसे यश मिळालेले नाही. परंतु एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० प्रारूपांत भारतीय संघ चमकदार कामगिरी करत आहे. ड्रेसिंग रूममध्ये पारदर्शकता राखल्यामुळे आणि खेळाडूंशी मोकळेपणाने संवाद साधल्यामुळेच हे यश मिळत असल्याचे गंभीरने नमूद केले.

आशिया चषक ट्वेन्टी-२० स्पर्धेत भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आहे. सलामीच्या लढतीत तुलनेने दुबळ्या संयुक्त अरब अमिरातीला पराभूत केल्यानंतर भारताने दुसऱ्या लढतीत रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धूळ चारली. त्यामुळे भारताचे ‘अव्वल चार’ फेरीतील स्थान जवळपास निश्चित झाले आहे. भारतीय संघाच्या या स्पर्धेतील आतापर्यंतच्या कामगिरीबाबत गंभीर समाधानी आहे.

‘‘आम्ही यापेक्षा चांगला खेळ करू शकलो नसतो. विशेषत: गोलंदाजांची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. आम्ही प्रतिस्पर्ध्यांना (पाकिस्तान) १२७ धावांत रोखले. सर्व फिरकीपटू, तसेच जसप्रीत बुमरा यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली हे निश्चितच समाधान देणारे आहे. आमची फलंदाजी मजबूत आहे. त्यामुळे आम्ही १२८ धावांचे लक्ष्य सहजपणे गाठू असा आम्हाला विश्वास होता. आम्ही ज्या प्रकारे सुरुवात केली ते अत्यंत महत्त्वाचे होते. आम्ही यापुढेही याच सवयी राखणे गरजेचे आहे,’’ असे प्रक्षेपणकर्त्या वाहिनीशी बोलताना गंभीर म्हणाला.

तसेच भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून आतापर्यंतच्या अनुभवाबाबतही त्याने भाष्य केले. ‘‘मी जितके चांगले दिवस पाहिले आहेत, तितकेच वाईटही पाहिले आहेत. मात्र, मी यासाठी पूर्णपणे तयार होतो. प्रशिक्षक व्हायचे ठरवले, तेव्हाच मला या गोष्टीची कल्पना होती. तुम्ही ड्रेसिंग रूममध्ये प्रामाणिकपणे आणि पारदर्शकता राखून काम करणे अत्यंत महत्त्वाचे असते. भारतीय क्रिकेटला आणखी पुढे नेण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. यात प्रशिक्षक, खेळाडू यांच्यासह समालोचक आणि विविध कार्यक्रमांत आपले मत मांडणाऱ्या जाणकारांची भूमिकाही महत्त्वाची असते,’’ असे गंभीरने सांगितले.

‘‘कसोटी क्रिकेटमध्ये आमच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आला हे कबूल. परंतु कसोटी संघ सध्या संक्रमणातून जात आहे हेसुद्धा लक्षात घेतले पाहिजे. खेळाडूंना पाठिंबा देत राहणे माझ्या हातात आहे आणि ते मी करत राहणार. भविष्यात आम्ही सकारात्मक निकाल मिळवत राहू अशी आशा आहे,’’ असेही गंभीर म्हणाला. पाकिस्तानविरुद्धचा सामना आणि विजय आमच्यासाठी महत्त्वाचा होता, कारण संघ म्हणून आम्हाला पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबीयांप्रति एकता दाखवायची होती. ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे राबविणाऱ्या सशस्त्र दलांचेही आम्ही आभार मानू इच्छितो. आम्ही क्रिकेटच्या मैदानावर देशवासीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करण्याचा प्रयत्न करू. गौतम गंभीर