Gautam Gambhir Scolds Harshit Rana: सिडनी क्रिकेट ग्राउंड (एससीजी) येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा आणि मालिकेतील शेवटचा एकदिवसीय सामना खेळला गेला. या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याप्रमाणेच वेगवान गोलंदाज हर्षित राणावर प्रचंड दबाव होता. अर्शदीप सिंगला बाजूला ठेवून हर्षितची संघात निवड केल्याबद्दल बराच वाद झाला. गौतम गंभीरचा माणूस म्हणून हर्षित राणाला ट्रोलही केले गेले. तरीही शांत राहून हर्षित राणाने आपल्या कामगिरीने उत्तर दिले. संघातील त्याच्या स्थानाबद्दल त्याचे बालपणीचे प्रशिक्षक श्रवण कुमार यांनी नुकताच एक मोठा दावा केला आहे.
ऑस्ट्रेलिया विरोधातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात हर्षित राणाने बहारदार कामगिरी केली. ८.४ षटकात त्याने ४.५० च्या इकॉनॉमीने ३९ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाला २३६ धावांवर रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. भारताने नऊ विकेट्सनी सामना जिंकला, ज्यामुळे भारतीय संघावर आलेली व्हाईटवॉशची वेळ टळली. हर्षित राणाने तीन सामन्यात सहा विकेट्स घेतल्या. तो या मालिकेत सर्वाधिक सहा विकेट घेणारा गोलंदाज ठरला.
हर्षित राणाची ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याची सुरुवात चांगली झाली होती. पर्थ आणि ॲडलेड सामन्यानंतर सिडनीतील तिसऱ्या सामन्यासाठीही त्याची निवड झाल्यानंतर तो चर्चेत आला. पण यावेळी गौतम गंभीरने त्याला स्पष्ट शब्दात ताकीद दिली असल्याची माहिती समोर आली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे. “तू चांगला खेळ दाखव, नाहीतर तुला बाहेर बसवेल”, (परफॉर्म कर वरना बाहर बिठा दूंगा) अशा शब्दात गौतम गंभीरने फटकारल्याचे स्वतः हर्षित राणाने त्याच्या आधीच्या प्रशिक्षकाला सांगितले. श्रवन कुमार यांना फोनवरून हर्षित राणा याने त्याच्यावर असलेल्या दबावाची माहिती दिली.
श्रवन कुमार यांनी टाइम्स ऑफ इंडियांशी बोलताना म्हटले की, सिडनीतील सामना २३ वर्षीय हर्षित राणासाठी एक मोठी कसोटी होती. त्याला टिकाकाराचे तोंड बंद करण्यासाठी चांगला खेळ करायचा होता आणि गौतम गंभीरने दिलेल्या तंबीमुळे त्याला हे करण्यासाठी आणखी बळ मिळाले.
गौतम गंभीरने हर्षितला फटकारलं होतं
श्रवन कुमार पुढे म्हणाले की, सामन्याआधी हर्षित राणाने मला फोन केला होता. त्याला त्याच्या कामगिरीने सर्वांना गप्प करायचे होते. मी त्याला म्हणालो, स्वतःवर विश्वास ठेव. मला माहीत आहे, काही क्रिकेटपटू म्हणतात की, हर्षित गंभीरच्या जवळचा आहे. पण गौतम गंभीरला खेळाडूंची प्रतिभा ओळखता येते. त्या प्रतिभेला संधी देण्याचे काम तो करतो. त्याने अनेक क्रिकेटपटू घडवले आहेत. गंभीरने खरंतर हर्षितला बाहेर बसविण्याची धमकी दिली होती.
श्रीकांत यांच्यावर टीका
श्रवन कुमार यांनी १९८३ सालच्या विश्वविजेत्या संघाचा भाग असलेल्या कृष्णमाचारी श्रीकांत यांनी हर्षित बाबत केलेल्या टिप्पणीवरही आक्षेप घेतला. ते म्हणाले, “श्रीकांत यांनी हर्षितचा मुद्दा उपस्थित केला होता. निवृत्तीनंतर अनेक क्रिकेटपटू आपले युट्यूब चॅनेल सुरू करतात. त्यातून ते पैसे कमावतात. पण कृपा करून नवोदित आणि वयाने लहान खेळाडूवर बोलताना काळजी घ्या. या मुलांनी आताच क्रिकेटची सुरुवात केली आहे. मार्गदर्शन करणे किंवा दटावण्याचा अधिकार तुम्हाला नक्कीच आहे. पण तुमच्या युट्यूब चॅनेलच्या प्रसिद्धीसाठी असे काही करू नका.”
गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली हर्षित राणाने कोलकाता नाइट रायडर्सच्या संघात चांगली कामगिरी केली होती. २०२४ च्या आयपीएल विजेत्या संघाचा तो भाग होता. अनकॅप्ड गोलंदाजामधून त्याने सर्वाधिक बळी मिळवले होते. गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यापासून राणाला भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली.
