‘‘नेयमारची दुखापत आणि दोन पिवळ्या कार्डमुळे कर्णधार थिआगो सिल्वावर असलेली एका सामन्याची बंदी, या धक्क्यातून ब्राझीलचा संघ सावरलाच नाही. आम्ही त्यांना एकामागोमाग धक्के देत गेलो, त्यामुळे ब्राझीलचा संघ आणखी गाळात रुतत गेला. म्हणूनच जर्मनीचे काम सोपे झाले,’’ अशा शब्दांत जर्मनीचे प्रशिक्षक जोकिम लो यांनी विजयानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘आपली क्षमता, जिद्द आणि शांतचित्ताने खेळ करून प्रतिस्पध्र्याला कडवी झुंज देणे महत्त्वाचे असते. पण ब्राझीलचा संघ शांतचित्ताने खेळत नव्हता, त्यामुळेच पहिल्या ३० मिनिटांत आम्हाला पाच गोल करता आले. प्रत्येकाने आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडली. आघाडीवीरांनी सुरेख खेळाचे प्रदर्शन केले.’’