दिएगो कोस्टा याला दुखापत झाली तरी त्याने केलेल्या दुसऱ्या गोलमुळे अ‍ॅटलेटिको माद्रिदने गेटाफेवर २-० असा विजय मिळवला. या विजयामुळे अ‍ॅटलेटिको माद्रिदने स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेतील आघाडी तीन गुणांनी वाढवली आहे.
स्पॅनिश लीगमधील पाच सामने शिल्लक असून अ‍ॅटलेटिको माद्रिद ८२ गुणांसह अव्वल स्थानी आहे. रिअल माद्रिदने ७९ गुणांसह दुसरे तर बार्सिलोनाने ७८ गुणांसह तिसरे स्थान पटकावले आहे. शनिवारी रात्री बार्सिलोनाला पराभूत व्हावे लागल्यामुळे अ‍ॅटलेटिको माद्रिद संघ आता १८ वर्षांनंतर स्पॅनिश लीगचे जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे.
पहिल्या सत्राचा खेळ फारसा कंटाळवाणा झाला. पण दिएगो गॉडिन याने ४०व्या मिनिटाला गोल करीत सामन्यात रंगत निर्माण केली. गेटाफेच्या अ‍ॅलेक्सिस रुआनो याने मिरांडाला गोलक्षेत्रात धक्का मारल्याप्रकरणी पंचांनी रुआनोला लाल कार्ड दाखवत बाहेरचा रस्ता दाखवला. या वेळी मिळालेल्या पेनल्टीवर दिएगो कोस्टाने मारलेला फटका गेटाफेचा गोलरक्षक जॉर्डी कॉडिना याने अडवत गेटाफेच्या बरोबरीच्या आशा कायम ठेवल्या. सामना संपायला सहा मिनिटे शिल्लक असताना दिएगो कोस्टाने सुरेख कामगिरी करून चेंडू गोलक्षेत्रात नेला. गोलरक्षक कॉर्डिनाला चकवून दुसरा गोल करीत कोस्टाने अ‍ॅटलेटिको माद्रिदच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दिएगो कोस्टाचा हा या मोसमातील २६वा गोल ठरला.

पराभवाच्या कटू आठवणी पुसायच्या आहेत : सिल्वा
पॅरिस : फ्रान्सकडून १९९८ च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम लढतीत झालेल्या पराभवाच्या आठवणी पुसायच्या आहेत व त्यासाठी आगामी चॅम्पियन्स फुटबॉल लीग स्पर्धेत विजेतेपद मिळवायचे आहे, असे ब्राझील संघाचा संभाव्य कर्णधार व पॅरिस सेंट जेर्मन संघाचा खेळाडू थिएगो सिल्वा याने सांगितले. फ्रान्स आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर विश्वचषकाची अंतिम लढत गमावणाऱ्या ब्राझील संघात त्या वेळी सिल्वाचा सहभाग नव्हता मात्र येथे होणाऱ्या लीग स्पर्धेत या पराभवाची परतफेड मला करायची आहे. माझ्या वरिष्ठ खेळाडूंना येथील स्टेडियमवर झिनेदीन झिदानच्या दोन गोलांमुळे पराभवास सामोरे जावे लागले होते. या पराभवाची सल अजूनही आमच्या वरिष्ठ खेळाडूंना वाटत आहे. आता माझ्यावर त्यांचे दु:ख हलके करण्याची जबाबदारी आहे. त्यासाठी मला पॅरिस सेंट जेर्मन संघाविरुद्ध विजय मिळवावा लागणार आहे, असे सिल्वा याने सांगितले. सिल्वा हा मधल्या फळीतील अव्वल दर्जाचा खेळाडू मानला जातो. त्याने आतापर्यंत अनेक स्पर्धामध्ये चमकदार कामगिरी केली आहे. सिल्वाच्या संघास परगावच्या सामन्यात चेल्सा संघाकडून हार स्वीकारावी लागली होती. चॅम्पियन्स लीगमध्ये अजिंक्यपद मिळविण्यासाठी आम्हाला खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे व त्यासाठी आम्ही चांगली तयारीही केली आहे, असेही सिल्वाने सांगितले. सिल्वाने २०१० च्या विश्वचषक स्पर्धेत ब्राझीलचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच त्याने २००८ व २०१२ च्या ऑलिम्पिकमध्येही भाग घेतला होता. लंडन येथील ऑलिम्पिकमध्ये सिल्वाच्या नेतृत्वाखाली ब्राझील संघास अंतिम लढतीत मेक्सिकोने हरविले होते.