वृत्तसंस्था, दुबई
भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) जुलै महिन्यासाठी सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. त्याची दक्षिण आफ्रिकेचा वियान मुल्डर आणि इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स या अष्टपैलू खेळाडूंशी स्पर्धा आहे.
गिलने इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत फलंदाजीत अनेक विक्रम रचले. गिलने मालिकेत ७५.४०च्या सरासरीने आणि चार शतकांच्या मदतीने ७५४ धावा केल्या. यामध्ये एका द्विशतकाचाही समावेश आहे. कसोटी मालिकेत भारतीय कर्णधाराने केलेल्या सर्वाधिक धावांचा सुनील गावस्कर (७३२ धावा) यांचा विक्रम गिलने मोडीत काढला.
गिल सार्वकालिक कर्णधारांच्या यादीत, सर डॉन ब्रॅडमननंतर (८१० धावा) दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सामन्यात मुल्डरने झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद ३६७ धावांची खेळी केली. त्याला ब्रायन लाराचा नाबाद ४०० धावांचा विक्रम मोडीत काढण्याची संधी होती, मात्र त्याने संघाचा डाव घोषित केला. त्याने मालिकेतील दोन सामन्यांत २६५.५० च्या सरासरीने ५३१ धावा केल्या. दुसरीकडे, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने भारताविरुद्ध चार सामने खेळताना फलंदाजीत ५०.२०च्या सरासरीने २५१ धावा केल्या, तर गोलंदाजीत १२ बळीही मिळवले.