मुंबई : ‘ग्लोबल चेस लीग’च्या आगामी हंगामात जगज्जेता दोम्माराजू गुकेश आणि अर्जुन एरिगेसी हे आघाडीचे भारतीय बुद्धिबळपटू पीबीजी अलास्कन नाइट्स संघाकडून खेळणार आहेत. यंदा १३ ते २४ डिसेंबर या कालावधीत रंगणाऱ्या तिसऱ्या हंगामासाठीची खेळाडू निवडप्रक्रिया (ड्राफ्ट) शुक्रवारी मुंबईत संपन्न झाली.
निवडप्रक्रियेला ‘आयकॉन’ फेरीपासून सुरुवात झाली. अल्पाइन एसजी पायपर्स संघाने अमेरिकेचा ग्रँडमास्टर फॅबियानो कारुआना, तर अलास्कन नाइट्सने गुकेशची निवड केली. पाच वेळच्या जगज्जेत्या विश्वनाथन आनंदला गंगेस ग्रँडमास्टर्सने पुन्हा संघात दाखल करून घेतले. अमेरिकेचा ग्रँडमास्टर वेस्ली सो याच्यासाठी बरीच स्पर्धा पाहायला मिळाली. अखेर तो अपग्रॅड मुम्बा मास्टर्स संघाचा भाग झाला. गंगेस ग्रँडमास्टर्सने जर्मनीचा २० वर्षीय व्हिन्सेन्ट केमेरचीही निवड केली.
‘‘आम्हाला सर्व सहा खेळाडूंची निवड करायची होती. त्यामुळे आमच्यासमोर मोठे आव्हान होते. आम्ही जगज्जेत्या गुकेशला संघात घेऊ शकलो याचा आनंद आहे. गुकेश आणि अर्जुन एरिगेसी दर्जेदार कामगिरी करतील याची खात्री आहे,’’ असे अलास्कन नाइट्स संघाचे प्रशिक्षक अभिजित कुंटे म्हणाले.
खेळाडू निवडप्रक्रियेपूर्वी सहापैकी चार संघांनी आपल्या प्रमुख खेळाडूंना संघात कायम ठेवणे पसंत केले होते. यात मुम्बा मास्टर्स संघाने ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी आणि द्रोणावल्ली हरिका या आघाडीच्या महिला बुद्धिबळपटूंसह ‘आयकॉन’ म्हणून फ्रान्सच्या मॅक्सिम व्हॅचिएर-लाग्रेव्ह याला संघात कायम राखले होते.
संघ
अपग्रॅड मुम्बा मास्टर्स : मॅक्सिम व्हॅचिएर-लाग्रेव्ह, शाखरियार मामेदेरोव, वेस्ली सो, कोनेरू हम्पी, द्रोणावल्ली हरिका, बर्दिया दानेश्वर.
अमेरिकन गॅम्बिट्स : हिकारू नाकामुरा, रिचर्ड रॅपपोर्ट, व्लादिस्लाव आर्टेमिएव्ह, बिबिसारा असाउबायेवा, टिओडोरा इंजॅक, वोलोदर मुर्झिन.
अल्पाइन एसजी पायपर्स : फॅबियानो कारुआना, आर. प्रज्ञानंद, अनिश गिरी, हो यिफान, निनो बत्सियाश्विली, लिओन मेन्डोन्का.
गंगेस ग्रँडमास्टर्स : विश्वनाथन आनंद, जावोखिर सिंदारोव, व्हिन्सेंट केमेर, स्टॅवरौला त्सोलाकिडौ, पोलिना शुवालोवा, रौनक साधवानी.
पीबीजी अलास्कन नाइट्स : दोम्माराजू गुकेश, अर्जुन एरिगेसी, लेनियर डोमिंगेझ, सारा खादेम, कॅटेरिना लायनो, डॅनियल दारधा. त्रिवेणी कॉन्टिनेंटल किंग्ज : अलिरेझा फिरूझा, यी वेई, विदित गुजराथी, अलेक्झांड्रा कोस्टेनियुक, झू जिनेर, मार्कआंद्रिया मॉरिझी.