वृत्तसंस्था, कुमामोटो
भारताच्या लक्ष्य सेन आणि एच. एस. प्रणॉय यांनी जपान मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी विजयी सलामी दिली. सातव्या मानांकित लक्ष्य सेन याने ३९ मिनिटांत जपानच्या कोकी वाताना याचा २१-१२, २१-१६ असा पराभव केला. प्रणॉयने संघर्षपूर्ण लढतीत पहिल्या फेरीचा अडथळा पार केला. त्याने मलेशियाच्या लेऑन्ग जुन हाओ याचे आव्हान १ तास ८ मिनिटांच्या लढतीत १६-२१, २१-१३, २३-२१ असे परतवून लावले.
सुरुवातीच्या बरोबरीनंतर पहिल्या गेमच्या मध्याला लेऑन्गने ११-९ अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतरही दोघांमध्ये गुणांसाठी झालेल्या चुरशीमुळे गेम बरोबरीत सुरू होता. मात्र, १३-१३ अशा बरोबरीला लेऑन्गने सलग पाच गुणांची कमाई करत १८-१३ अशी आघाडी घेतली आणि ती कायम राखत पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये प्रणॉय सातत्याने आघाडीवर होता. मात्र, हा फारक एक-दोन गुणांचाच होता. प्रणॉयने ८-८ अशा बरोबरीला सलग सहा गुणांची कमाई करत १६-८ अशी मिळवलेली आघाडी दुसरा गेम जिंकताना निर्णायक ठरवली. तिसऱ्या गेमला लेऑन्गने ५-० अशी दमदार सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर प्रतिआक्रमण करताना प्रणॉयने ६-२ अशा स्थितीत सलग पाच गुण मिळवत ६-७ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर मात्र गेम सातत्याने बरोबरीतच सुरू राहिला. लेऑन्गने १९-१९ अशा बरोबरीनंतर २०-१९ आणि २१-२० असे दोन ‘गेम पॉइंट’ मिळवले. मात्र, त्याचा फायदा त्याला घेता आला नाही. प्रणॉयने नंतर सलग तीन गुणांची कमाई करताना गेमसह विजयावर शिक्कामोर्तब केले.
अन्य लढतीत भारतीय खेळाडू अपयशी ठरले. आयुष शेट्टीला जपानच्या कोडाई नाराओकाकडून १६-२१, ११-२१, तरुण मानेपल्ली याला कोरियाच्या जेऑन ह्येओक जीनकडून ९-२१, १९-२१, किरण जॉर्जला मलेशियाच्या कॉक जिंग होंगकडून २०-२२, १०-२१ असा पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत रोहन कपूर आणि ऋत्विका शिवानी गड्डे या भारतीय जोडीला अमेरिकेच्या प्रेस्ली स्मिथ आणि जोनी गई जोडीकडून २१-१२, १९-२१, २२-२० अशी हार पत्करावी लागली.
