भारताचा महान ऑफस्पिनर हरभजन सिंग लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. हरभजन इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) भाग राहणार आहे. आयपीएल २०२२च्या एका प्रमुख फ्रेंचायझीच्या सपोर्ट स्टाफचा सदस्य म्हणून हरभजन सिंग दिसणार आहे. पीटीआयच्या बातमीत हा दावा करण्यात आला आहे.

४१ वर्षीय हरभजनने आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात कोलकाता नाइट रायडर्स संघासाठी (KKR) काही सामने खेळले. परंतु लीगच्या यूएई लेगमध्ये तो एकही सामना खेळू शकला नाही. हरभजन सिंग पुढील आठवड्यात स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा करेल, अशी चर्चा आहे. त्यानंतर तो एका आयपीएल फ्रेंचायझीच्या सपोर्ट स्टाफमध्ये सामील होणार आहे.

आयपीएलच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले, ”हरभजनची नवी भूमिका मार्गदर्शक किंवा सल्लागार संघाचा भाग असू शकते. संबंधित फ्रेंचायझीला हरभजनच्या अनुभवाचा फायदा करून घ्यायचा आहे. लिलावात खेळाडूंची निवड करण्यात फ्रेंचायझीला मदत करण्यातही तो सक्रिय भूमिका बजावेल.” हरभजन सिंग आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळला आहे.

हेही वाचा – “देशावर हा मोठा आघात…”, जनरल बिपिन रावत यांच्या निधनावर क्रिकेटविश्व हळहळलं; विराटसह अनेक दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

या संघांपैकी हरभजनने मुंबई आणि चेन्नईसोबत विजेतेपद पटकावले. आयपीएल २०२१ मध्ये कोलकातासोबत त्याला ट्रॉफी जिंकण्याची संधी होती, पण संघ अंतिम फेरीत पराभूत झाला. त्याने आयपीएलमध्ये १६३ सामने खेळले आणि १५० विकेट घेतल्या. १८ धावांत पाच बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हरभजन सिंगने भारतासाठी १०३ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ४१७ विकेट घेतल्या. वनडेमध्ये त्याने २३६ सामन्यात २६९ विकेट घेतल्या आहेत. टी-20 मध्ये त्याने भारतासाठी २८ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २५ विकेट्स घेतल्या आहेत.