मुंबई आणि उत्तर प्रदेश यांच्यात रणजी करंडकातील उपांत्य सामना बंगळुरूमधील जस्ट क्रिकेट अकादमी मैदानावर खेळवला जात आहे. मुंबईचा पहिला डाव १४०.४ षटकांत ३९३ धावांवर आटोपला होता. मुंबईला एवढी मोठी धावसंख्या उभी करण्यात त्यांचा यष्टीरक्षक हार्दिक तामोरेने मोठे योगदान दिले. या सामन्यानंतर हार्दिक तामोरेच्या खेळीचे सर्वजण कौतुक करत आहेत. आता कौतुकास पात्र ठरलेल्या हार्दिकचा हा प्रवास सोपा नव्हता. एक वेळ तर अशी आली होती की, आईमुळे त्याचे क्रिकेट खेळणे पूर्णपणे थांबणार होते. कारण परीक्षेत कमी गुण मिळाल्याने हार्दिकच्या आईने त्याला क्रिकेट खेळण्यास बंदी घातली होती.

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना हार्दिकचे वडील जितू तामोरे यांनी याबद्दल सांगितले. ते म्हणाले, “मला आजही आठवते १२ वर्षांपूर्वी हार्दिकचे प्रशिक्षक झाकीर शेख यांनी फोन करून मला एका अत्यंत महत्त्वाच्या विषयासाठी भेटण्याची विनंती केली होती. हार्दिकला पाचवीत अपेक्षेपेक्षा कमी गुण पडल्याने त्याला यापुढे क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली जाणार नाही, असा निर्णय त्याच्या आईने घेतला होता. परीक्षेतील कमी गुणांमागे हार्दिकची क्रिकेटची आवड कारणीभूत असल्याचे त्याच्या आईला वाटत होते.”

हेही वाचा – VIDEO : ‘पंतसेने’चे राजकोटमध्ये आगमन तर, कसोटी संघाचे इंग्लंडसाठी उड्डाण

जीत तामोरे म्हणाले, “हार्दिकचे कोच मला भेटले आणि म्हणाले की, तुमचा मुलगा खूप चांगला खेळतो. त्याचं क्रिकेट खेळणे थांबवू नका. जोपर्यंत त्याच्या अभ्यासाचा प्रश्न आहे, आपण सर्वांनी एकदा त्याच्याशी बोलायला हवे.” दुसऱ्याच दिवशी हार्दिकने क्रिकेट खेळताना अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये, हे समजावण्यासाठी तामोरे कुटुंबीय आणि कोच एकत्र आले. त्यांनी हार्दिकला शिक्षणाचे महत्व पटवून दिले आणि मग त्याच्या आईने त्याला क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली.

हार्दिकने यष्टीरक्षक आणि फलंदाज व्हावे, अशी त्याच्या प्रशिक्षकांची इच्छा होती. पण मुंबईकडून खेळण्यासाठी त्याला १२७ किलो मीटरचा प्रवास करावा लागायचा. हार्दिकचे काही मित्र सरावासाठी रोज रेल्वेने मुंबईला जात असत. त्यामुळे आता आपल्या मुलालाही क्रिकेट खेळण्यासाठी रोज हा प्रवास करावा लागणार, हे जीतू तामोरे यांच्या लक्षात आले.

हेही वाचा – ICC T20I Rankings : ईशान किशनची हनुमान उडी! आयसीसीने जाहीर केली टी २० क्रमवारी

“आम्ही त्याला चर्चगेट येथील एल्फ अकादमीमध्ये दाखल केले. तिथून त्याचा प्रवास सुरू झाला. त्याचा दिवस पहाटे पाच वाजता सुरू व्हायचा. तो सव्वा सहा वाजता शाळेत पोहोचायचा. शाळेने त्याला अर्ध्या दिवसाची सुट्टी दिली होती, त्यामुळे तो भोईसरहून सकाळी साडेदहा वाजता रेल्वेत बसायचा, चर्चगेटला सराव करायचा आणि रात्री नऊनंतर घरी यायचा. असे तब्बल पाच वर्षे सुरू होते,” असे जीतू तामोरे यांनी सांगितले.

त्यानंतर जीतू तामोरेंचे मित्र दीपक पाटील यांनी त्यांना मुंबईला जाण्याचा सल्ला दिला. दीपक पाटील हे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माजी व्यवस्थापकीय समितीचे सदस्य होते. यानंतर जीतू भोईसरहून माहीम येथे भाड्याच्या घरात राहू लागले. पण मुंबईत राहूनही हार्दिकने भोईसरमध्येच शिक्षण सुरू ठेवले. “हार्दिक मुंबईकडून अंडर-१४ संघासाठी खेळला. तेव्हापासून त्याने कधी मागे वळून पाहिलेच नाही. विशेष म्हणजे त्याने अभ्यासातही चांगली कामगिरी केली,” असे जीतू तामोरे म्हणाले.

स्थानिक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करूनही हार्दिक तामोरेला मुंबई रणजी संघात स्थान मिळाले नाही. टीममध्ये आदित्य तरे यष्टिरक्षक फलंदाज म्हणून होता. अनेक वर्ष हे सुरू होतं. पण उत्तराखंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत आदित्य तरे जखमी झाला आणि संघातून बाहेर पडला. त्यानंतर त्याच्या जागी हार्दिक तामोरेची निवड करण्यात आली. हार्दिक तामोरेनेही संधीचे सोने करत ११५ धावांची खेळी करत अप्रतिम कामगिरी केली.