दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी २० मालिकेतील चौथा सामना खेळण्यासाठी भारतीय संघ गुजरातमधील राजकोटला पोहोचला आहे. दोन्ही संघांमधील चौथा टी-२० सामना शुक्रवारी (१७ जून) सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्त्वाखाली भारतीय टी २० संघ आज राजकोटला पोहचला. पारंपरिक गरबा नृत्याने भारतीय संघाचे स्वागत करण्यात आले. याच दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्याची तयारी करण्यासाठी भारतीय कसोटी संघातील काही खेळाडूंनी इंग्लंडसाठी उड्डाण केले आहे.

भारतीय टी २० संघ राजकोटला पोहचला मात्र, या संघासोबत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड वगळता कोणताही सपोर्ट स्टाफ आलेला नाही. नियमित सपोर्ट स्टाफऐवजी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील (एनसीए) साईराज बहुतुले आणि शितांशु कोटक राजकोटमध्ये दाखल झाले आहेत. भारताचे नियमित फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड आणि इतर सपोर्ट स्टाफ इंग्लंडसाठी रवाना झाला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टी २० संघाचा राजकोटमधील आगमनाचा व्हिडिओ आणि इंग्लंडला निघालेल्या खेळाडूंचे फोटो शेअर केले आहेत. बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये भारतीय टी २० संघाचा विशाखापट्टणम ते राजकोटपर्यंतचा संपूर्ण प्रवासाचे क्षणचित्रे दाखवण्यात आले आहेत. राजकोटला पोहोचलेल्या संघाचे गरबा नृत्याने स्वागत केले जाते. यावेळी अर्शदीप सिंग थिरकताना दिसला.

दुसरीकडे, माजी कर्णधार विराट कोहली, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, मुहम्मद शामी आणि रविंद्र जडेचा यांनी इंग्लंडला जाण्यासाठी उड्डाण घेतले आहे. १ जुलैपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्याची पूर्व तयारी करण्यासाठी हे खेळाडू तिथे गेले आहेत.