ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या तिरंगी टी-२० मालिकेत भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियावर मात केली आहे. मराठमोळ्या स्मृती मंधानाने झळकावलेलं अर्धशतक व तिला इतर फलंदाजांनी दिलेली सर्वोत्तम साथ या जोरावर भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियाने दिलेलं १७४ धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं. ७ विकेट राखत भारतीय महिलांनी हा सामना जिंकला.

दरम्यान या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने अनोख्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. महिला टी-२० क्रिकेटमध्ये धावसंख्येचा पाठलाग करताना सर्वाधिकवेळा नाबाद राहण्याच्या विंडीजच्या डेंड्रा डॉटीनच्या विक्रमाशी हरमनप्रीतने बरोबरी केली.

ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या १७४ धावांचा पाठलाग करताना कर्णधार हरमनप्रीत कौरने नाबाद २० धावांची खेळी केली. दिप्ती शर्माने नाबाद ११ धावा केल्या. स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी केलेल्या भक्कम सुरुवातीनंतर हरमनप्रीतने भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.