Harmanpreet Kaur Masterstroke Shafali Verma Bowling: महिला विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २९९ धावांचं आव्हान दिलं आहेत. भारताकडून सलामीवीर शफाली वर्माने सर्वाधिक ८७ धावांची मोठी खेळी केली. तर स्मृती मानधनासह तिने १०४ धावांची भागीदारीही रचली आणि भारताच्या फायनलमधील या धावसंख्येत मोठी भूमिका बजावली. दरम्यान गोलंदाजीतही विकेट्सची भारताला प्रतिक्षा असताना हरमनप्रीतने मोठा डाव खेळला आणि टीम इंडियाला २ विकेट्स मिळाल्या.
तॅझमिन ब्रिटसला अमनजोत कौरने धावबाद केल्याने भारताला ब्रेकथ्रू मिळाला. त्यानंतर श्रीचरणीने एनिके बॉशला पायचीत करत संघाला दुसरी विकेट मिळवून दिली. यानंतर लॉरा वुल्फार्ट व सुने लुस यांच्यात महत्त्वपूर्ण भागीदारी होत होती. त्यामुळे भारताला त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी व सामन्यात टिकून राहण्यासाठी विकेटची गरज होती.
हरमनप्रीत कौरने इतक्यात मोठा डाव खेळला. प्रतिका रावलला दुखापत झाल्याने तिच्या जागी शफाली वर्माला संघात संधी मिळाली होती. फलंदाजीबरोबरच शफाली गोलंदाजीही करू शकते. तितक्यात हरमनने शफालीला गोलंदाजीला आणण्याचा मोठा निर्णय घेतला. फायनल सामन्यात पार्ट टाईम गोलंदाजाला अशा महत्त्वाच्या वळणावर गोलंदाजी देणं मोठा निर्णय होता. पण शफालीने मात्र निराश नाही केलं.
हरमनने २१ वं षटक ऑफस्पिनर शफाली वर्माला गोलंदाजी दिली. पहिला चेंडू निर्धाव राहिल्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर शफालीने सुने लुसला झेलबाद केलं. लुस शफालीच्या गोलंदाजीवर समोर फटका खेळली आणि शफालीने कोणतीही चूक न करता चेंडू टिपला आणि संघाला महत्त्वपूर्ण विकेट मिळाली. या षटकात तिने फक्त ५ धावा दिल्या. शफालीने विकेट घेताच तिने कर्णधार हरमनप्रीत कौरला उचलून घेतलं.
शफाली वर्माला यानंतर २२व्या षटकात पुन्हा गोलंदाजी सोपवली. यावेळेस तिने पहिल्याच चेंडूवर आफ्रिकेची महत्त्वाची फलंदाज मारिजान कॅपची विकेट मिळाली. या षटकात तिने फक्त १ धाव देत विकेट घेतली.
