भारतीय महिला क्रिकेट संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा ८८ धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने २३ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका जिंकली आहे. यापूर्वी चंद्रकांता कौलच्या नेतृत्वाखाली भारताने १९९९ मध्ये इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली होती. तब्बल २३ वर्षांनंतर भारतीय महिला संघाने इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका जिंकण्याचा कारनामा केला.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ५ गडी गमावून ३३३ धावा केल्या. हरमनप्रीत कौरने १११ चेंडूत १४३ धावांची नाबाद खेळी खेळली. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संपूर्ण संघ ४४.२ षटकांत २४५ धावांवर गारद झाला. इंग्लंडकडून डॅनियल व्याटने ६५ धावा केल्या. वेगवान गोलंदाज रेणुका सिंगने चार गडी बाद केले. त्याआधी भारतीय संघाची शेफाली वर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरल्यानंतर स्मृती मंधाना व यास्तिका भाटिया यांनी ५४ धावांची भागीदारी केली. दोघी अनुक्रमे ४० व २६ धावा काढून बाद झाल्या. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर व हरलीन देओल यांनी डावाची सूत्रे हाती घेत ११३ धावांची भागीदारी केली. हरलीनने सुंदर अर्धशतक साजरे केले. ती ५८ धावा करून बाद झाल्यानंतर पूजा वस्त्रकार व दीप्ती शर्मा यांनी हरमनप्रीतला सुयोग्य साथ देत भारताला मोठी धावसंख्या उभारून देण्यात योगदान दिले.

हरमनप्रीतने एकदिवसीय कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले. पूजा वस्त्राकर १६ चेंडूत १८ धावा करून बाद झाली. यानंतर हरमनप्रीत आणि दीप्ती शर्माने सहाव्या गड्यासाठी २४ चेंडूत ७१ धावांची नाबाद भागीदारी रचली. अशाप्रकारे भारताने इंग्लंडसमोर ३३४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. एकदिवसीय सामन्यांमध्ये ही भारतीय संघाची इंग्लंडविरुद्ध सर्वोच्च धावसंख्या आहे.

हेही वाचा   :  महिला क्रिकेट संघात जेमिमाचे पुनरागमन 

३३४ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड संघाची सुरुवात खराब झाली. ४७ धावांपर्यंत संघाने तीन गडी गमावले होते. टॅमी ब्युमॉन्ट सहा, एम्मा लॅम्ब (१५ धावा) आणि सोफिया डंकलेने एक धावा केल्या. यानंतर एलिस कॅप्सी आणि डॅनियल व्याट यांनी चौथ्या गड्यासाठी ५५ धावांची भागीदारी रचली. एलिस ३६ चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने ३९ धावा करून बाद झाला. त्याचवेळी डॅनियलने अर्धशतक झळकावले. ती ५८ चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने ६५ धावा करून बाद झाली. यानंतर नियमित अंतराने इंग्लंडच्या गडी बाद होत राहिले.

हेही वाचा   :   विश्लेषण : भारतीय गोलंदाज धावसंख्येचा बचाव करण्यात का ठरत आहेत अपयशी?

अखेरीस इंग्लंड संघ २४५ धावांवर सर्वबाद झाला व भारतीय संघाने ८८ धावांनी विजय साकार केला. वेगवान गोलंदाज रेणुका सिंगने चार बळी आपल्या नावे केली. मालिकेतील अखेरचा सामना लॉर्ड्स येथे खेळला जाईल. हा सामना अनुभव वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी हिच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना असेल.