Chris Woakes Shot: इंग्लंडचा संघ आपल्या बॅझबॉल स्टाईल फलंदाजीसाठी ओळखला जातो. भारतीय संघाविरुद्ध सुरू असलेल्या पाचव्या कसोटीतील पहिल्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांनी बॅझबॉल स्टाईल फलंदाजी केली. सलामीला आलेल्या बेन डकेटने यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून अविश्वसनीय फटका मारला. मात्र, हॅरी ब्रुकने मारलेल्या फटक्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याने मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर दमदार षटकार मारला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
भारताचा स्टार फलंदाज ऋषभ पंत दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर आहे. ऋषभ पंत जेव्हा फलंदाजीला येतो तेव्हा तो रिव्हर्स स्कूप किंवा खेळपट्टीवर झोपून शॉट मारतो. आता त्याच्या अनुपस्थितीत इंग्लंडच्या फलंदाजांनी असे फटके मारले आहेत. आधी बेन डकेटने रिव्हर्स स्कूप शॉट मारला. त्यानंतर हॅरी ब्रुकने मिड विकेटच्या दिशेने दमदार षटकार मारला.
तर झाले असे की, भारतीय संघाची गोलंदाजी सुरू असताना ४८ वे षटक टाकण्यासाठी मोहम्मद सिराज गोलंदाजीला आला. या षटकातील दुसरा चेंडू सिराजने ऑफ साइडच्या दिशेने टाकला. या चेंडूवर हॅरी ब्रुकने ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन मिड विकेटच्या दिशेने स्वीप शॉट मारला. चेंडू बॅटला लागताच वेगाने मिड विकेटच्या दिशेने ६ धावांसाठी गेला. हा शॉट पाहिल्यानंतर बेन स्टोक्ससह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
इंग्लंडचा पहिला डाव
या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाचा डाव २२४ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव २४७ धावांवर आटोपला. इंग्लंडकडून फलंदाजी करताना जॅक क्रॉलीने ६४, बेन डकेटने ४३, ओली पोपने २२, जो रूटने २९, हॅरी ब्रुकने ५३ धावांची खेळी केली. या डावात इंग्लंडने २३ धावांची आघाडी घेतली. इंग्लंडचा डाव आणखी लवकर आटोपला असता ,पण हॅरी ब्रुकने एक बाजू धरून ठेवली होती. ९ गडी बाद झाल्यानंतर इंग्लंडचा डाव आटोपला , कारण ख्रिस वोक्स या सामन्यातून बाहेर पडला आहे. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना प्रसिध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी ४-४ गडी बाद केले. तर आकाशदीपने एक गडी बाद केला.