Harshit Rana Attends Gautam Gambhir Dinner Party Video: भारतीय संघ सध्या मायदेशात वेस्ट इंडिजविरूद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने १-० अशी आघाडी मिळवली आहे. यादरम्यान भारतचा दुसरा कसोटी सामना दिल्लीमध्ये १० ऑक्टोबरपासून होणार आहे. यापूर्वी भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने भारताच्या कसोटी संघाला आपल्या राहत्या घरी डिनरसाठी आमंत्रण दिलं होतं. पण संघाचा भाग नसतानाही हर्षित राणाच्या उपस्थितीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी बुधवारी दिल्लीतील आपल्या राजेंद्र नगर येथील निवासस्थानी भारतीय संघासाठी खास डिनरचं आयोजन केलं. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ बसमधून साध्या कॅज्युअल पोशाखात गंभीरच्या घरी पोहोचले. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला, ज्यात सर्वजण गंभीर यांच्या घरात प्रवेश करताना दिसले.
भारताचा कसोटी संघ बसमधून अन् हर्षित राणाची कारमधून ऐटीत एन्ट्री
यादरम्यान, सोशल मीडियावर वेगवान गोलंदाज हर्षित राणा दिसला नाहीयात हर् म्हणून चाहत्यांनी गंमतीत तो या डिनरसाठी गैरहजेर असल्याची चर्चा सुरू केली. पण मात्र त्याने स्वतः हजेरी लावून या चर्चांना पूर्णविराम दिला. गौतम गंभीरच्या घरी आयोजित करण्यात आलेली डिनर पार्टी ही फक्त कसोटी संघातील खेळाडूंसाठी होती, हे स्पष्ट होतं. पण हर्षित राणाने संघाचा भाग नसतानाही या पार्टीसाठी हजेरी लावली.
भारताचा संपूर्ण संघ टीम बसमधून गंभीरच्या घरी पोहोचले. तर हर्षित राणा मात्र नंतर त्याच्या कारमधून एकटाच ऐटीत पार्टीसाठी पोहोचला. हर्षित राणाच्या गौतम गंभीरच्या घरी असलेल्या डिनर पार्टीसाठी उपस्थितीने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. हर्षित राणाची संघात निवड पाहता तो गौतम गंभीरचा खास असल्याची चर्चा केली जात होती, आता या चर्चेला दुजोरा मिळाला आहे. हर्षित राणाच्या एन्ट्रीच्या खास व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
हर्षित राणा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाबरोबर दिसणार आहे. कारण हर्षितची निवड वनडे आणि टी-२० मालिकेसाठी करण्यात आली आहे. हर्षित राणाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी झालेल्या वादग्रस्त निवडीमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं. त्याची आशिया चषक २०२५साठी संघातील निवड देखील टीकेचा विषय ठरली होती, यानंतर अनेकांनी त्याला “गंभीरचा आवडता खेळाडू” म्हणत मीम्सचा पाऊस पाडला.
संघ व्यवस्थापनाकडून सातत्याने पाठिंबा मिळूनही, हर्षित अजूनही दिलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊ शकलेला नाही. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता नाईट रायडर्ससाठी आयपीएल २०२४ मध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर त्याची भारतीय संघात लगेच निवड झाली. परंतु बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याने फक्त दोन कसोटी सामने खेळून चार बळी घेतले. ज्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली.