Mohammed Siraj vs Joe Root: लॉर्ड्सच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या इंग्लंडला सुरूवातीलाच २ मोठे धक्के बसले आहेत. नितीश कुमार रेड्डीने सलामीवीर फलंदाज जॅक क्रॉली आणि बेन डकेटला स्वस्तात माघारी धाडलं आहे. त्यानंतर जो रूट आणि ओली पोपने मिळून इंग्लंडचा डाव सांभाळला आहे.
जो रूट हा इंग्लंडचा प्रमुख फलंदाज आहे. त्यामुळे जो रूट खेळपट्टीवर टिकून राहणं किती महत्वाचं आहे, हे सर्वांना माहीत आहे. इंग्लंडला सुरूवातीला २ मोठे धक्के बसल्यानंतर, जो रूटवर एक बाजू धरून ठेवण्याची मोठी जबाबदारी होती. त्याने ही जबाबदारी योग्यरित्या पार पाडली. पण सिराजने त्याचं लक्ष विचलित करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. यादरम्यान दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचेगी पाहायला मिळाले.
तर झाले असे की, भारतीय संघाकडून पहिल्या डावातील ३१ वे षटक टाकण्यासाठी मोहम्मद सिराज गोलंदाजीला आला. या षटकात सिराजने सर्व ६ चेंडू अचूक टप्प्यावर टाकले. पण रूटने ते चेंडू सोडून दिले आणि स्टंपवर येणारे चेंडू खेळून काढले. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू टाकल्यानंतर, सिराज रूटकडे गेला आणि त्याला काहीतरी बोलताना दिसून आला. मात्र, रूटने काहीच प्रत्युत्तर दिलं नाही. या बाचाबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
इंग्लंडला सुरूवातीलाच २ मोठे धक्के
या सामन्यात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात फलंदाजीसाठी मैदानात आला आहे. मात्र, डावाची सुरूवात करताना इंग्लंडला हवी तशी सुरूवात करता आलेली नाही. इंग्लंडकडून जॅक क्रॉली आणि बेन डकेटची जोडी डावाची सुरूवात करण्यासाठी आली. या जोडीकडून चांगल्या सुरूवातीची अपेक्षा होती. पण नितीश कुमार रेड्डीने आपल्या पहिल्याच षटकात दोघांनाही बाद करत माघारी धाडलं. आधी बेन डकेट लेग स्ंटपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर षटकातील शेवटच्या चेंडूवर जॅक क्रॉली देखील बाद होऊन माघारी परतला. यासह इंग्लंडला ४३ धावांवर पहिला आणि ४४ धावांवर दुसरा धक्का बसला.