क्रिकेटच्या सामन्यात क्षेत्ररक्षणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. क्षेत्ररक्षणात एकजरी चूक झाली तरी संपूर्ण सामना हातातून निसटण्याची शक्यता असते. आतापर्यंत अशी अनेक उदाहरणेही झाली आहे. अगदीच अलीकडील उदाहरण द्यायचे झाल्यास, ९ जून रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान झालेल्या सामन्यात डुसेनचा सुटलेला झेल भारतीय संघासाठी फार महागात पडला. एकूणच काय तर क्षेत्ररक्षणात चुका करणे एका अर्थाने मोठा गुन्हा ठरू शकतो. अशा स्थितीत जर एखाद्या खेळाडूला धावबाद करण्यासाठी चार-चार संधी मिळूनही त्यात यश आले नाही तर? युरोपियन क्रिकेट स्पर्धेमध्ये असाच एक किस्सा घडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युरोपियन क्रिकेट लीगमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये असे दिसते की, ‘खेळपट्टीवरील फलंदाज पुढे येऊन कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतो. परंतु, त्याचा अंदाज चुकतो आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जातो. दरम्यान, नॉन स्ट्राईकर फलंदाज धाव घेण्यासाठी धावू लागतो. त्याचवेळी यष्टीरक्षक त्याला धावबाद करण्यासाठी चेंडू फेकतो पण त्याचा नेम चुकतो. त्यानंतर तो पुन्हा चेंडू उचलतो आणि गोलंदाजीकडे फेकतो.

गोलंदाजालाही योग्यवेळी तो चेंडू पकडता येत नाही. यादरम्यान दोन्ही फलंदाज दुसरी धाव घेण्यासाठी धावू लागतात. खराब क्षेत्ररक्षणाचा हा प्रकार इथेच थांबत नाही. गोलंदाज पुन्हा चेंडू स्ट्रायकरच्या बाजूला फेकतो तर तिथे उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाला चेंडू पकडता येत नाही. या दरम्यान दोन्ही फलंदाज तिसरी धावही घेतात. अशा पद्धतीने १५ यार्ड सर्कलच्या बाहेर चेंडू न टोलावताही फलंदाजाला तीन धावा मिळतात.

हेही वाचा – ‘मी अशी अपेक्षा करणेही चुकीचे’, के एल राहुल आणि रोहित शर्माबद्दल भारतीय सलामीवीराचे मोठे वक्तव्य

फॉक्स क्रिकेटने आपल्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ‘त्यांनी तीन धावा कशा चोरल्या’, अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या मजेशीर व्हिडिओवर सोशल मीडिया युजर्सनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. ‘यांच्यापेक्षा तर गल्ली क्रिकेटमधील खेळाडू चांगले क्षेत्ररक्षण करतात,’ अशी कमेंट एकाने केली आहे. आणखी एका व्यक्तीने कमेंट केली आहे की, ‘आजपर्यंत मी यापेक्षा चांगले क्षेत्ररक्षण पाहिले नाही.’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hilarious fielding video from european cricket league goes viral vkk
First published on: 11-06-2022 at 11:18 IST